प्रशासन राबवता येत नाही ते राज्य काय चालवणार

अशोक चव्हाण यांचा सरकारवर  हल्लाबोल

महाडमध्ये सत्ताधारी शासनाविरोधात जनआक्रोश

महाड – (निलेश पवार) : केंद्र आणि राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयाने देशातील आणि राज्यातील जनता त्रस्त झाली आहे. या शासनाविरोधात कॉंग्रेसने राज्यभरात जनआक्रोश उभा केला असून महाडमध्ये संपूर्ण कोकण विभागाचा जनआक्रोश मेळावा आज पार पडला. या मेळाव्यात कॉंग्रेस नेत्यांनी सत्ताधारी सरकार विरोधात आणि कॉंग्रेस मधून गेलेल्या नारायण राणे यांच्या विरोधात अप्रत्यक्षपणे चांगलेच तोंड सुख घेतले. यावेळी बोलताना अशोकराव चव्हाण यांनी ज्या सरकारला प्रशासन राबवता येत नाही ते सरकार राज्य काय चालवणार ? असा सवाल केला.

महाडमध्ये कॉंग्रेस पक्षाचा सत्ताधारी पक्षाविरोधात घेतलेला जनआक्रोश मेळावा पार पडला. या मेळाव्याला कॉंग्रेस चे केंद्रीय निरीक्षक मोहन प्रकाश, कॉंग्रेस कमिटी चे अध्यक्ष माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधान परिषदेचे सभापती माणिकराव ठाकरे, खा. हुसैन दलवाई, कॉंग्रेस कमिटी चे चिटणीस मानिकराव जगताप, विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण पाटील, आमदार शरद रणपिसे, आ. भाई जगताप, माजी आ. मधु ठाकूर, आ. नसीम खान, आदी ज्येष्ठ नेते उपस्थित होते. यावेळी बी.जे.पी सरकारने घेतलेल्या निर्णयाविरोधात या सर्व नेत्यांनी चांगलाच हल्लाबोल केला. सरकारने जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करता आलेली नाही यामुळे हे सरकार पूर्णत अपयशी आहे अशा शब्दात टीका करण्यात आली.

आपल्या भाषणात अशोकराव चव्हाण यांनी सरकारने दिलेली अभिवचने पाळण्यात सरकार अपयशी आले आहे. या सरकारविरोधात चले जाव ची भूमिका संपूर्ण राज्यात घ्यावी लागणार आहे. पंतप्रधान मोदी यांनी अच्छे दिन आयेगे असे म्हणाले पण हे अच्छे दिन केवळ धन धनदांडग्यांच्या फायद्यासाठी आल्याचे स्पष्ट केले. केंद्र आणि राज्य हे दोन्ही थापेबाज सरकार आहे. नोट बंदी नंतर देशात सर्वत्र बेरोजगार वाढीस लागला. शेतकऱ्यांना त्यांच्या धान्याला हमीभाव देता आला नाही यामुळे जनता त्रास्त आहे. आता बदल करण्याची वेळ आली असून भविष्यात या सरकारला घरचा रस्ता जनता दाखवेल अशा शब्दात टीकास्त्र सोडले.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील सरकारच्या कामांचा अपेक्षाभंग झाल्याचे सांगून जनतेला दिलेली आश्वासने सरकारला पूर्ण करता आलेली नाहीत. क्रेडीट कार्ड कंपन्यांच्या दबावाखाली सरकारने डिजिटलायझेशनचे नाटक उभे करून मोठ्या प्रमाणात परदेशी कंपन्यांना कमिशन दिले गेले. यामुळे देशात आणि राज्यात सत्तापरिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास देखील चव्हाण यांनी व्यक्त केला. आपल्या वेगळ्या भाषण शैलीत बोलताना मोहन प्रकाश यांनी कार्यकर्त्याची मरगळ दूर केली. हे सरकार बड्या लोकांच्या फायद्यासाठी काम करत असल्याचे सांगून देशाचे पंतप्रधान जग फिरतात ते केवळ जनतेच्या पैशावर अशी टीका करून अमित शहा आणि मोदि हे देश विकण्याचे काम करत आहेत असे सांगितले.

आपल्या प्रास्ताविकपर भाषणात माणिकराव जगताप यांनी देशातील आणि राज्यातील स्थितीचा आढावा घेत राज्यात सरकारने सर्वसामन्याची घोर निराशा केली असून शेतकऱ्याला कर्जमाफी देण्याचे सांगून कर्ज माफी दिली नाहि, एकही ठोस काम सरकारने केलेले नाही यामुळे राज्यात आणि देशात कॉंग्रेस शिवाय आता पर्याय नसल्याचे स्पष्ट केले. याठिकाणी उपस्थित असलेले नसीम खान, हुसैन दलवाई, राधाकृष्ण विखे पाटील, भाई जगताप, माणिकराव ठाकरे, यांची देखील भाषणे झाली. महाड तालुक्यात नुकत्याच निवडून आलेल्या सरपंच, सदस्य यांचा सत्कार देखील यावेळी करण्यात आला.

कोकणातून कॉंग्रेस संपेल हा समाज चुकीचा

नारायण राणे टीकेचे लक्ष

कोकणातील कॉंग्रेस नेतृत्व माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी कॉंग्रेसला सोडचिठी दिल्यानंतर कोकणात कॉंग्रेस संपली कि काय अशी चर्चा वर्तवली जात होती. यावर भाष्य करताना सर्वच कॉंग्रेस नेत्यांनी अप्रत्यक्षपणे नारायण राणे यांना टीकेचे लक्ष केले. माणिकराव जगताप आणि भाई जगताप यांनी याबाबत बोलताना कोकणात कॉंग्रेस शिल्लक आहे हे समोरील गर्दीने दाखवून दिले आहे असे सांगितले. जे कॉंग्रेस मधून गेले त्यांना कॉंग्रेस कधीच कळली न्हवती. अशोक चव्हाण यांनी देखील याबाबत बोलताना गेलेल्यांना कॉंग्रेस समजली न्हवती यामुळे माणिक राव जगताप तुम्ही कोकणात पुढे या आम्ही आपल्या पाठीशी आहोत असे सांगत कोकणातील जबाबदारी कॉंग्रेस माणिकराव जगताप यांच्या गळ्यात घालणार असे चिन्ह दिसू लागले आहे.

या कार्यक्रमादरम्यान महाडमध्ये उभे केलेले अग्निशमन केंद्राचे उद्घाटन देखील या मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. तसेच महाड नगर परिषदेच्या प्रशासकीय इमारतीचे देखील भूमिपूजन यावेळी करण्यात आले. अग्निशमन दलाची हि इमारत महाराष्ट्र अग्निसुरक्षा अभियानअंतर्गत जवळपास ८५ लक्ष रुपये खर्च करून बांधण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *