मुंबई दि.11(प्रतिनिधी ): एम फॉर सेवा ही चेन्नईत मुख्यालय असलेली आणि ग्रामीण भागातील शिक्षणावर लक्ष केंद्रित करणारी स्वयंसेवी संस्था (एनजीओ) महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात आपले शैक्षणिक कार्यक्षेत्र विस्तारण्यास उत्सुक आहे. या प्रयत्नाचा एक भाग म्हणून, संस्थेच्या वतीने दि. १४, १५ जानेवारी रोजी दोन दिवशीय ,तीन मैफलींचा ‘ ज्ञानगंगा संगीत महोत्सव 2023’ मुंबईतील प्रसिद्ध गेटवे ऑफ इंडिया येथे आयोजित करण्यात आला आहे . भारतातील अनेकविध सादरीकरण कलांचा समृद्ध वारसा जोपासण्यावर लक्ष केंद्रित करणारी मुंबईस्थित पंचम निषाद क्रिएटिव्ह्स ही संस्था या कार्यक्रमासाठी एम फॉर सेवाची इव्हेण्ट मॅनेजमेंट सहयोगी आहे.
एम फॉर सेवाच्या ग्रामीण भारताला शिक्षित करण्याच्या कार्यात सहभागी होणाऱ्या कलावंतांमध्ये शंकर महादेवन, रंजनी-गायत्री, कौशिकी चक्रवर्ती, जयतीर्थ मेवुंडी, झी मराठी वाहिनीच्या सा रे ग म प: लिटील चॅम्पियन मधील मराठी गायिका व अभिनेत्री आर्या आंबेकर, मुग्धा वैशंपायन, प्रथमेश लघाटे, पूजा गायतोंडे, अंतरा नंदी आणि अॅबी व्ही. व मेहताब अली इत्यादी प्रस्थापित 11 कलावंत आपली कला सादर करून या कामासाठी संस्थेला सहयोग करत आहेत.
2000 साली स्थापन झालेल्या एम फॉर सेवाचे उद्दिष्ट, सेवा, काळजी घेणे, शहरी व ग्रामीण भागातील विषमता दूर करणे, प्रत्येक व्यक्तीला राष्ट्राच्या प्रगतीत योगदान देण्यास सक्षम करणे यांच्या माध्यमातून, समाजात कायापालट घडवून आणणे हे आहे. गेल्या 22 वर्षांपासून एम फॉर सेवा या संस्थेने ग्रामीण भारताच्या सक्षमीकरणाचा वसा घेतला आहे. आपले फ्लॅगशिप कार्यक्रम, छात्रालयम आणि शिक्षण संस्थांच्या माध्यमातून संस्था हे काम करत आहे.