कल्याण : कायद्याने वागा लोकचळवळ आयोजित बहुचर्चित फातिमाबी-सावित्री उत्सव व फातिमाबी-सावित्री पुरस्कार वितरण सोहळा, २०२३ शनिवार, २८ जानेवारी, २०२३ रोजी कल्याणात के सी गांधी शाळेच्या प्रेक्षागृहात होत आहे. या कार्यक्रमाच्या स्वागताध्यक्षपदी ॲड. उदय रसाळ यांची निवड करण्यात आली आहे.

राज असरोंडकर यांनी स्थापन केलेल्या कायद्याने वागा लोकचळवळीचं फातिमाबी- सावित्री उत्सवाचं यंदाचं नववं वर्ष आहे. या कार्यक्रमाला यापूर्वी रामनाथ सोनवणे, रविंद्र आंबेकर, किरण सोनवणे, संजय आवटे, प्रतिमा जोशी, कुंदा प्र नि, प्रज्ञा पवार, उर्मिला पवार, निलेश खरे, डॉ. विनोद कुमरे, सुषमा देशपांडे, डॉ. नीतिन आरेकर, मुमताज शेख, हरी नरके, डॉ. गणेश देवी अशा कला, साहित्य, पत्रकारिता, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली आहे.

ॲड. उदय रसाळ गेली अनेक वर्ष सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. कल्याण विकासिनीच्या माध्यमातून त्यांनी अनेक नागरी समस्यांबाबत आवाज उठवलाय. स्थानिक प्रशासनाशी संघर्ष केलाय. त्यांनी कल्याण डोंबिवली महानगर पालिकेत कल्याण पूर्वेचं निर्वाचित लोकप्रतिनिधी म्हणून प्रतिनिधीत्व केलंय. राज्याच्या महिला आर्थिक विकास महामंडळासोबतही ते कार्यरत होते. ॲड. उदय रसाळ यांची वैचारिक बांधिलकी कायम पुरोगामी विचारांची राहिली आहे. ते समाजमाध्यमांतही स्पष्टपणे अभिव्यक्त होत असतात.

ॲड. रसाळ यांच्या सामाजिक कार्यप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याची संधीही आम्हाला फातिमाबी सावित्री उत्सवाच्या निमित्ताने घ्यायची आहे. त्यामुळेच त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर त्यांनी होकार कळवल्यावर त्यांचे नाव स्वागताध्यक्ष म्हणून निश्चित करण्यात आले, असं कायद्याने वागा लोकचळवळीचे संस्थापक राज असरोंडकर यांनी सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *