मनसेचा आज रंगशारदात मेळावा : राज ठाकरेंच्या भूमिकेकडे लक्ष
मुंबई : मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा आज हॉटेल रंगशारदा, वांद्रे (प.) येथे सायंकाळी ६.३० वा. मेळावा होणार आहे. अनधिकृत फेरीवाल्यांचा प्रश्न आणि मनसेच्या पदाधिकार्यावर फेरीवाल्यांकडून झालेला जीवघेणा हल्ला या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे मेळाव्यात काय बोलतात याकडे सगळ्यांचे लक्ष वेधलं आहे.
एल्फिन्स्टिन दुर्घटनेनंतर राज ठाकरे यांनी रेल्वे प्रशासनाविरोधात भव्य संताप मोर्चा काढला होता. १५ दिवसात रेल्वे स्टेशन परिसरातील फेरीवाल्यांचा बंदोबस्त करावा असा इशारा राज यांनी रेल्वे आणि महापालिका प्रशासनाला दिला होता. त्यानंतर मनसैनिकांनी फेरीवाल्यांविरोधात ठिकठिकाणी आंदोलन केली. अनेक मनसैनिकावर केसेस दाखल होऊन, त्यांना अटकही झाली. तर दादर येथे फेरीवाल्यांना हुसकावीत असतानाच मनसे पदाधिकारी सुशांत माळवदे यांच्यावर फेरीवाल्यांनी जीवघेणा हल्ला केला. मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम हे फेरीवाल्यांच्या समर्थनार्थ उतरले असून, त्यांच्या चिथावणीमुळेच मनसैनिकवर हल्ला झाल्याचा आरोप मनसेने केला होता त्यानंतर निरुपम यांच्या घरासमोर मन सैनिकांनी आंदोलन केले होते. या सगळ्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे काय भूमिका मांडतात याकडे लक्ष वेधले आहे.