डोंबिवली : डोंबिवलीतील रिक्षा चालक संतोष राणे यांनी प्रामाणिकपणा दाखवित रिक्षात विसरलेले पाच तोळयाचे सोन्याचे दागिने महिला प्रवाशाला परत केल्याची घटना सोमवारी दुपारच्या सुमारास घडली. प्रामाणिक रिक्षा चालकाचे सर्वत्रच कौतूक होत आहे. सोन्याचे दागिने परत मिळाल्यानंतर महिलेचा चेहरा आनंदाने फुलून गेला.
पश्चिमेत राहणा-या दिपाली राजपूत या दुपारी स्टेशनकडे येण्यासाठी एका रिक्षात बसल्या. रिक्षातून त्या स्टेशनला आल्यानंतर आपली बॅग त्या रिक्षात विसरून निघून गेल्या, त्या बॅगेत ५ तोळयाचे सोन्याचे दागिने हेाते. बॅग हरविल्याने त्या भयभीत झाल्या, त्यांची तारांबळ उडाली. बॅगेची शोधाशोध करण्यास सुरूवात केली. दरम्यान प्रवासी रिक्षात बॅग विसल्याचे रिक्षा चालक संतोष राणे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी ती बॅग दिपाली यांना सुरक्षितपणे परत केली. हरविलेली पाच तोळे सोन्याची बॅग मिळाल्यानंतर दिपाली यांचा चेहरा आनंदाने फुलून गेला. रिक्षा चालक प्रवाशांकडून जादा पैसे घेतात, भाडे नाकारतात, अशा प्रकारचे अनेक किस्से कानावर पडत असतात. पण रिक्षात राहिलेली बॅग परत करून संतोष राणे या रिक्षा चालकाने एक नवा आदर्श समोर ठेवला आहे. डोंबिवली पश्चिमेतील रिक्षा चालक संघटनेचे अध्यक्ष भगवान मोरजकर आणि राजा चव्हाण यांनी प्रामाणिक रिक्षा चालक राणे यांचे कौतुक केले.