राज्यभरात ओला दुष्काळ जाहीर करण्याची केली मागणी..
नागपूर : पारंपारिक विचार आणि घराणेशाहीसह काळ्या पैशावर कुणालाही विकत घेण्याची भाषा वापरणाऱ्या महाराष्ट्र सरकारला सामान्य जनतेच्या हिताचे काही घेणे-देणे नाही, असा आरोप करीत आम आदमी पार्टीने शुक्रवार (२३ डिसेंबर) रोजी यशवंत स्टेडियम पासून ते विधानभवन चौक यादरम्यान मोर्चा काढला होता. राज्यात अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा व त्यांना प्रती हेक्टरी ५० हजार इतकी नुकसान भरपाई द्या अशी मागणी यावेळी करण्यात आली. विमा कंपन्यादेखील शेतकऱ्यांना पाहिजे त्या प्रमाणात सहकार्य करीत नाहीत, बरेच चुकीचे किंवा क्लिष्ट नॉर्म असल्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान झाल्यावर सुद्धा विमा रकमेपोटी भरलेल्या रकमेएवढी मदत मिळत नाही, ही वास्तविकतादेखील मांडण्यात आली.
बेरोजगारी, वाढती महागाई यांसारख्या गंभीर समस्यांना राज्यातील जनतेला तोंड द्यावे लागत आहे व त्यांना आपले जीवन जगणे कठीण झाले आहे. सामान्य नागरिकांच्या जीवनाशी संबंधित अनेक प्रश्न प्रलंबित असताना सरकार मधील काही मंत्री, आमदार किंवा राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आणि राज्याच्या सर्वोच्य पदावर विराजमान असलेले व्यक्ती मात्र महापुरुषांबद्दल चुकीचे विधाने करून राज्यातील जनतेचे व पर्यायाने विरोधी पक्षाचे मुळ प्रश्नांपासून लक्ष विचलित करण्यात यशस्वी होत आहेत. हे राज्याचे दुर्दैव आहे अशी खंत यावेळी मोर्चेकऱ्यांनी व्यक्त केली.
आम आदमी पार्टीचे महाराष्ट्र संयोजक रंगा राचुरे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला होता. महाराष्ट्र प्रभारी दीपक सिंगला, राज्य संघटन मंत्री विजय कुंभार, राज्य सचिव धनंजय शिंदे, राज्य उपाध्यक्ष धनराज वंजारी यांच्या शिष्टमंडळाने राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन सदर मागण्यांचे पत्र त्यांना दिले. यंदाच्या हिवाळी अधिवेशनात या सर्व प्रश्नांवर सविस्तर चर्चा करून जनहिताचे निर्णय घ्यावेत. अन्यथा, या मागण्यांना घेऊन राज्यव्यापी जन आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.