डोंबिवली दि.23 ( शिरीष वानखेडे) : प्रोसेसिंग फीच्या नावाखाली गरजू ग्राहकांकडून लाखो रुपये उकळणाऱ्या टोळीला मानपाडा पोलिसांनी दिल्लीमधून जेरबंद केले आहे. नमन संजय गुप्ता,( वय २२), आकाशकुमार सुनिल चांदवानी(वय २८ )व रिशी दिपककुमार सिंग (वय २८) अशी अटक करण्यात आलेल्या या त्रिकुटाची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून गुन्हयातील ७ लाख ३४ हजार ५०० रुपये, ५ मोबाईल फोन आणि एटीएम कार्ड असा एकूण ९ लाख २१ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.
डोंबिवली राहणारे अनिल आव्हाड हे गृहकर्ज घेण्यासाठी विविध बँकांमध्ये प्रयत्न करत असताना, २२सप्टेंबर रोजी त्यांना आर. के. शर्मा नावाच्या व्यक्तीचा फोन आला. त्यावेळी त्याने तो बजाज फायनॅन्समधून बोलत असल्याचे सांगितले. तुमच्या नावावर १० लाखाचे कर्ज मंजूर झाल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर आव्हाड यांना बजाज फायनान्सच्या नावाने १० लाख रुपयाचे कर्ज मंजुर झाल्याचे फोन व मॅसेज वारंवार येवु लागले. तसेच कर्ज हवे असल्यास शषांक प्रसाद यांचे नांवे कोटक महिंद्रा, दिल्ली या बँकेचे अकाऊंटवर प्रथम ३० हजार रुपये प्रोसेसिंग फी भरावी लागेल असे सांगण्यात आले.
त्यानंतर आव्हाड यांनी कर्ज मंजुरीसाठी ३० हजार रुपये शषांक प्रसाद यांचे बँक अकाऊंटवर पाठविले. त्यानंतर आव्हाड यांना वारंवार प्रोसेसिंग फी साठी आणखी रक्कम लागेल. तसेच तुमचे कर्ज २७ लाख रुपये मंजुर झाले आहे. त्यासाठी आणखी रक्कम भरणा करावी लागेल,असे सांगण्यात आले. समोरील व्यक्तीच्या बोलण्यावर विश्वास ठेवून आव्हड हे त्यांनी दिलेल्या वेगवेगळया बँक खात्यावर पैसे भरू लागले . तसेच तुम्ही पैसे भरले नाही तर तुमचे यापुर्वी भरलेले पैसे बुडतील अशा प्रकारची भीती दाखवून त्यांच्या कडून ७ लाख ३४ हजार ५०० रुपये विविध बँक अकाऊंटवर भरणा करण्यास भाग पाडले. त्यानंतर आव्हाड यांनी लोन संदर्भात त्या व्यक्तीशी बोलणे केले असता,आणखी एक लाख रुपये भरावे लागतील असे सांगितले. त्यामुळे त्यांना संशय आला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच आव्हाड यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.
मानपाडा पो.स्टे.वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांनी तातडीने गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी सुनील तारमळे यांना तपास करण्यास सांगितले. तारमळे यांनी फिर्यादी यांनी ज्या बँकांमध्ये पैसे भरणा केले आहेत, त्या बँकांची माहिती प्राप्त केली आणि ते बँक अकाऊंट सील करणेबाबत संबधित बँकांशी पत्रव्यवहार केला. त्यावरुन ते बँक अकाऊंट सील करण्यात आले. या बँक अकाऊंटवर असलेल्या पत्यांची खात्री करणेसाठी पोलिसांचे पथक दिल्ली येथे रवाना झाले.
शिमला, दिल्ली, उत्तरप्रदेश येथून आरोपीला अटक
बँक अकाऊंटचे पत्यांवर आरोपीचा शोध घेतला असता, त्यातील नमन गुप्ता हा अमृतसर येथे असल्याचे समजल्याने त्याचा अमृतसर येथे शोध घेतला, त्यावेळी तो शिमला येथे गेल्याचे आढळुन आले. त्याप्रमाणे शिमला, हिमाचल प्रदेश येथे जावुन त्याचा शोध घेतला असता तो शिमला येथे एका लॉजवर मिळुन आला. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याचे साथीदार हे नोयडा, उत्तरप्रदेश व दिल्ली येथे राहत असल्याचे समजल्याने, त्याने दिलेल्या माहितीवरुन आकाशकुमार चांदवानी यास दिल्ली येथून व रिशी सिंग यास नोएडा, उत्तरप्रदेश येथून ताब्यात घेण्यात आले.
या तिघांकडे चौकशी केली असता, या टोळीने बनावट कागदपत्रांचे आधारे विविध बँकांमध्ये अकाऊंट उघडुन, उत्तरप्रदेश, बिहार, झारखंड, पुणे येथे राहणारे नागरीकांना बजाज फायनॅन्सचे लोन मंजुर झाल्याची बतावणी करून गंडवल्याचे अनेक प्रकार उघडीस आले. ही कामगिरी कल्याण पुर्व प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, परिमंडळ ३ चे पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ व डोंबिवली विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुनिल कुराडे यांचे मार्गदर्शनाखाली मानपाडा पोलीस ठाणेचे वपोनिरी. शेखर बागडे, पोनिरी. (प्रशा) सुरेश मदने, सपोनि सुनिल तारमळे,अविनाश वणवे, पोहवा,.सुशांत तांबे, सुनिल पवार, पो.ना. भिमराव शेळके, प्रविण किनरे, पो.शि. बालाजी गरुड, संतोष वायकर यांचे पथकाने केलेली आहे