नागपूर : हिवाळी अधिवेशनाच्या आधी मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत नवीन लोकायुक्त कायद्याला मुख्यमंत्रयांनी मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळही लोकायुक्तांच्या कक्षेत असणार आहेत. लोकायुक्त कायद्याचं बील याच अधिवेशनात मांडणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. भ्रष्टाचार मोडून काढण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं.
हिवाळी अधिवेशनाच्या पूर्व संध्येला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. फडणवीस यांनी सांगितले की, अण्णा हजारे यांच्या समितीचा रिपोर्ट सरकारने स्वीकारला आहे. केंद्राप्रमाणे राज्यात लोकपाल कायदा आला पाहिजे अशी त्यांची मागणी होती. याविषयी मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली. मागील सरकारने ही मागणी फार गांभीर्याने घेतली नाही. अण्णांच्या मागणीनुसार नवीन लोकआयुक्त कायद्याला मंजुरी दिली आहे. राज्यात पहिल्यांदा मुख्यमंत्री यांना लोकायुक्तांच्या कक्षेत आणणार आहोत. मंत्रिमंडळ देखील लोकायुक्तात येईल. अँटी करप्शन ऍक्टला लोकायुक्ताचा भाग केले आहे. लोकायुक्त हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टाचे न्यायधीश या दर्जाचे असतील अशी माहिती फडणवीस यांनी दिली.
सीमावादावर बोलताना फडणवीस म्हणाले की, “हे सरकार आल्यानंतरच जणू काही सीमावाद सुरु झाला, अशाप्रकारे बोललं जातंय. खरंतर जतच्या गावांनी आम्हाला कर्नाटक जायचंय असा ठराव २०१३ साली केला, जेव्हा यांचं सरकार होतं. त्यानंतर २०१६ साली ७७ गावांना आपण पाणी पाहोचवलं. आणि उर्वरित गावांना पाणी पोहोचवण्याचं काम एकनाथ शिंदे करत आहेत”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
राज्याचं लवासा करायचं नाही : मुख्यमंत्री
मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी अजित पवार आणि उद्धव ठाकरेंवर तोफ डागली. अजितदादांच्या तोंडी खोक्यांची भाषा शोभत नाही, राज्याचा लवासा करायचा नाही अशी टीका शिंदेंनी केली. २०१९ ला राज्यात जे सरकार स्थापन झाल ते अनैतिक सरकार होतं. सोयरीक एकाशी केली आणि संसार दुसऱ्याशी थाटला. हे सर्वांना माहीत आहे. हे खोके सरकार आहे, अशी टीका अजित पवार करतात. पण, खोक्याची भाषा अजितदादा यांना शोभणारी नाही. खोक्यांचा जर एकावर एक ढिग रचला तर खूप उंच होईल. नजर पोहचणार नाही शिखर इतकं उंच शिखर होईल आणि शेवटी त्याचा कडेलोट होईल असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला. तर लोकायुक्त बीलाविषयी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, महाराष्ट्रात आम्हाला भ्रष्टाचार मुक्त कारभार करायचा आहे. यासाठी लोकायुक्त बील या अधिवेशनात मांडणार आहेात.
…..म्हणून विरोधकांचा चहापानावर बहिष्कार
नागपूर : सोमवारपासून (दि १८ डिसेंबर) राज्याचे हिवाळी अधिवेशन नागपुरमध्ये सुरू होत आहे. अधिवेशनाच्या पुर्व संधेला सत्ताधारी पक्षाकडून विरोधी पक्षनेत्यांना चहापानाचे आमंत्रण दिले होते. ज्यावर विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला. याबाबत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत खुलासा केला.
हिवाळी अधिवेशनाच्या पुर्वसंधेला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. ज्यामध्ये त्यांनी अधिवेशनासह अनेक विषयांवर संवाद साधला. अजित पवार म्हणाले की, “एकनाथराव शिंदे यांनी विरोधकांना चहापानाला बोलवले होते. पण आम्ही चर्चा केली. सहा महिने सत्तेत आलेले हे सरकार अपेक्षा पूर्ण करु शकले नाही. सरकारमधील नेत्यांकडून महापुरुषांबाबत बेताल वक्तव्य करणे सुरूच आहे. राज्यातील प्रकल्प गुजरातला गेले. सीमाप्रश्न, शेतकऱ्यांना पीकविमा मिळत नाही. या सर्वांवर आम्ही विचार केला आणि चहापानावर बहिष्कार टाकला.”