मुंबई : महापुरूषांविषयीच्या वादग्रस्त वक्तव्यांचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीचा मुंबईत विराट मोर्चा काढण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यपालांची त्वरीत हकालपट्टी करा अशी मागणी करीत, आज लोक शांततेनं आहे. ही हकालपट्टी वेळीच झाली नाहीतर हा महाराष्ट्र रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा पवार यांनी केंद्र सरकारला दिला.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह भाजप नेत्यांकडून महापुरूषांबद्दल करण्यात आलेली वादग्रस्त विधान, महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद यासह विविध मुद्द्यावरून महाविकास आघाडीचा विराट असा महामोर्चा निघाला. या मोर्चाची सांगता ही विराट अशा सभेनंच झाली. यावेळी बोलताना शरद पवार यांनी केंद्र व राज्य सरकारवर जोरदार टीका केली.
शरद पवार म्हणाले की, आज राज्यातून महाराष्ट्राच्या सन्मानासाठी लाखो लोक एकत्र आले. आज ज्यांच्या हातात सत्ता आहे, ती लोक वेगळ्या प्रकारची भाषा वापरत आहे. संपूर्ण महाराष्ट्राला एकत्र आणण्याचे काम शिवरायांची केलं आहे. पण आज 350 वर्ष झाली हिंदवी स्वराज्याचे संस्थापक म्हणून शिवरायांचं नाव घेतलं जात आहे. पण, राज्याच्या सरकारमधील मंत्री हे शिवरायांबद्दल वाटेल ते विधान करतो, अन्य कुणी काही तरी बोलतो. हे महाराष्ट्र सहन करणार नाही. आज लोकशाही मार्गाने त्यांना कायमचा धडा शिकवायचा असून स्वस्थ बसणार नाही, राज्यपालांची हकालपट्टी त्वरीत करा, अशी मागणी पवारांनी केली. महाराष्ट्रात मी अनेक राज्यपाल पाहिले, मात्र असे राज्यपाल आतापर्यंत कधीच पाहिले नाहीत, असं शरद पवार यांनी म्हटलं.
स्वत:ला बाळासाहेबांचा विचार पुढे घेऊन जाणारे तोतये समजतात. : उध्दव ठाकरेंचा शिंदेवर हल्लाबोल
उद्धव ठाकरे म्हणाले, संयुक्त महाराष्ट्राच्यानंतर असे दृष्य देशाने नव्हे तर जगाने पाहिलं असेन. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यावेळी प्रचंड संघर्ष करावा लागला. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला, पण अजूनही बेळगाव कारवार निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झाला नाही. तो घेतल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. मार्चात सर्वपक्ष एकवटले आहेत. फक्त महाराष्ट्रद्रोही या मोर्चात नाहीत. स्वत:ला बाळासाहेबांचा विचार पुढे घेऊन जाणारे तोतये समजतात. पण, त्यांचे विचार दिल्लीशी लाचारी करणारे नव्हते. खुर्ची गेली तर बेहत्तर पण महाराष्ट्राच्या स्वाभीमान आणि अस्मितेशी तडजोड करणार नाही. असं कोणी करण्याचा प्रयत्न करेन, त्याला गुडघ्यावर खाली झुकवल्याशिवाय राहणार नाही, कारण ही शिवसेना आहे,” असे म्हणत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केला.
अस्मितेवर घाव घातल्यास महाराष्ट्र पेटून उठतो : अजित पवार
अजित पवार म्हणाले की, “युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज हे आपले दैवत आहेत, त्यांच्याबाबत बेताल वक्तव्ये करण्याचं काम सुरू आहे. ही वक्तव्ये करणाऱ्या राज्यपालांना हटवण्यात यावं,” अशी मागणी केली आहे. गेल्या 6 महिन्यांपासून हे सरकार अस्तित्वात आहे. महाराष्ट्राच्या मातीला भाऊबंदकीचा शाप असला तरी अस्मितेवर घाव घातल्यास महाराष्ट्र पेटून उठतो. ध्येय साध्य केल्याशिवाय शांत बसत नाहीत, याची साक्ष देणारा हा मोर्चा आहे,” असंही अजित पवार यांनी म्हटलं.
हे सरकार फेब्रुवारी महिना बघणार नाही : संजय राऊत
संजय राऊत म्हणाले की, महाविकास आघाडीच्या आजच्या मोर्चाने महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना डिसमिस केलं आहे. आता त्यांना या पदावर एक मिनिटही राहण्याचा अधिकार नाही, महाराष्ट्रात शिवाजी महाराजांचा डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुलेंचा अपमान कुणी सत्तेत बसू शकेल का ? शिंदे फडणवीस सरकार तुम्ही फेब्रुवारी महिना बघणार नाही. असा संताप राऊत यांनी व्यक्त केला.
केंद्रातलं सरकारही उलथून टाकू : नाना पटोले
काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या महाराष्ट्र द्रोह्यांविरोधात आज जनता एकवटली आहे. लाखोंच्या संख्येने आंदोलक महामोर्चात सहभागी झाले आहेत. या एकजुटीनं महाराष्ट्रातील सरकारच नाही तर त्यांना अभय देणारं केंद्रातलं सरकारच उलथून टाकू, असं आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं. .महाराष्ट्राची अस्मिता कायम रहावी, यासाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे. राज्यातील जनतेनं लाखोंच्या संख्येने उपस्थिती लावली. भाजपने तर आंदोलन करत आहे. चोराच्या उलट्या बोंबा, यानिमित्ताने हे चित्र सिद्ध झालं. केंद्राच्या सरकारला उलथून पाडण्याचा संकल्प आपण केला पाहिजे, अशी अपेक्षा नाना पटोले यांनी व्यक्त केली.