पुणे : कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा जोतिराव फुले यांच्या विषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी राज्याचे उच्च तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या तोंडावर शाईफेक करण्यात आली. समता परिषदेच्या कार्यकत्यांनी शाईफेक केल्याचे बोललं जातं याप्रकरणी पेालिसांनी शाईफेक करणा़-यांना ताब्यात घेतलय
पिंपरी चिंचवडमध्ये मोरया गोसावी महोत्सवासाठी मंत्री चंद्रकांत पाटील आले होते. तत्पूर्वी पाटील हे कार्यकत्यांच्या घरी थांबले होते. तेथून कार्यक्रमास्थळी जाण्यासाठी निघाले असतानाच, चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आली. या प्रकरणी तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. यावरून विरोधक चांगलेच आक्रमक झाले होते, त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी दिलगीरी व्यक्त केली होती. मात्र चंद्रकांत पाटील आज पिंपरी चिंचवडमध्ये कार्यक्रमात आल्यानंतर त्यांच्यावर शाईफेक करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
शाईफेक झाल्यानंतर प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, मी चळवळीतला कार्यकर्ता आहे. कोणाला घाबरत नाही हि झुंडशाही आहे. लोकशाही नाही. राज्यात झुंडशाही चालणार नाही. हिंमत असेल तर शब्दाला शब्दाने टक्कर देता येते. मी ग्रामीण भागातील असल्याने एखाद्या शब्द बोललो मात्र त्या शब्दाचा विपर्यास करण्यात आला. पण मी तातडीने दिलगीरी व्यक्त केली. मात्र दिलगीरी व्यक्त केल्यानंतरही अशा प्रकारचे कृत्य झाल्याने पाटील यांनी नाराजी व्यक्त केली मात्र वंदेमातरम कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकरांविषयी गौरवोद्गार काढले होते ते भाषण माध्यमांनी दाखवले नाही अशी नाराजीही त्यांनी व्यक्त केली.
काय म्हणाले चंद्रकांत पाटील …
औरंगाबादमधील पैठण येथील संतपीठ येथील कार्यक्रमात चंद्रकांत पाटील यांनी भाषण केलं. सीएसआरचं महत्व सांगताना पाटील म्हणाले की, ‘सरकारवर अवलंबून का राहताय? या देशात शाळा सुरू कुणी केल्या? कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा सुरू केल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शाळा सुरू केल्या. महात्मा जोतिराव फुले यांनी शाळा सुरू केल्या. या सगळ्यांनी शाळा सुरू करताना सरकारनं त्यांना अनुदान दिलं नाही. त्यांनी लोकांकडे भीक मागितली, शाळा चालू केली आणि आम्हाला पैसे द्या, असं सांगितलं. आता त्या काळी १० रुपये देणारे होते, सध्या तर १०-१० कोटी रुपये देणारे लोक आहेत ना?’ असं चंद्रकांत पाटील यांनी आपल्या भाषणात म्हटलं होतं.