ठाणे, दि. ५ (प्रतिनिधी) : ठाणे जिल्हा हा मुंबईलगतचा जिल्हा आहे. परंतु जेवढा भाग विकसित आहे. तेवढाच भाग अविकसित असल्याने, विकसित आणि अविकसित या दोघांमधील अंतर केंद्रीय योजनांच्या माध्यमातून कमी करता येईल, असे प्रतिप्रादन केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी सोमवारी दिशा समितीच्या बैठकीत केले.

जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समितीची (दिशा) बैठक आज जिल्हा नियोजन भवनात केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी बोलताना पाटील म्हणाले की, केंद्र सरकारच्या माध्यमातून विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी प्राप्त होतो. दिशा समितीच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्याच्या विकसित व अविकसित भागातील फरक दूर करण्याचा प्रयत्न अधिकाऱ्यांनी करावा अशी सूचना वजा आदेश त्यांनी प्रशासनाला दिले.

केंद्र सरकारच्या गतीमान कारभाराबरोबरच आता राज्याचा कारभारही वेगाने सुरू आहे. बुलेट ट्रेन, वडोदरा महामार्गाच्या भूसंपादनासंदर्भातील कामाची लवकरात लवकर पूर्तता करावी. प्रधानमंत्री आवास योजनेतून घरे देण्यासाठी २०२२ पर्यंत मुदत निश्चित करण्यात आली होती. मात्र, जिल्ह्यातील घरांचे लक्ष्य पूर्ण झालेले नाही. त्यामुळे या योजनेतील अडचणी दूर करून घरे बांधण्यासाठी प्रयत्न करावेत असेही त्यांनी सांगितले. केंद्र सरकारच्या विविध योजनांची अंमलबजावणी संथ गतीने सुरू आहे. सध्या दिशा समितीची बैठक दरमहा तीन महिन्याने होते. त्याऐवजी जिल्हाधिकारी स्तरावर महिन्यात बैठक घेतल्यास कामांना वेग येईल अशी सुचना पाटील यांनी केली.

तलावांच्या विकासासाठी निधी उपलब्ध करण्यासाठी होर्डिंगचे हक्क कंत्राटदाराला देण्याची सुचना आमदार गणपत गायकवाड यांनी केली होती. त्याबाबत प्रस्ताव तयार करण्याच्या सुचना पाटील यांनी दिल्या. ठाणे जिल्ह्याच्या विविध भागात पीएमजीएसवाय योजनेतून सुरू असलेल्या रस्त्यांची कामे योग्य नसल्याची तक्रार बैठकीत करण्यात आली. एकाच कंत्राटदाराला कामे देण्यात आली असल्याकडे आमदार निरंजन डावखरे यांनी लक्ष वेधले. त्यावेळी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी संबंधित सर्व कामांच्या दर्जाची चौकशी करण्याचे आदेश दिले.

भिवंडी तालुक्यातील ६० गावांच्या रिंगरोडचा प्रस्ताव तयार करा

भिवंडी तालुक्याच्या विकासासाठी काही वर्षांपूर्वी ६० गावांमधून रिंग रोड तयार करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. मात्र, त्याची अंमलबजावणी झाली नव्हती. आता पुन्हा रिंगरोडचा प्रस्ताव तयार करावा, अशी सुचना केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल यांना केली.

एक आमदार, एक खासदारांच्या मतदारसंघात स्मार्ट सिटीची कामे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्मार्ट सिटी या महत्वाकांक्षी योजनेत कल्याण डोंबिवली महापालिकेचा समावेश करण्यात आला आहे. मात्र या योजनेतील विकास काम हि एक आमदार एक खासदार यांच्याच मतदारसंघात सुरु असल्याचे दिसून आले आहे. सध्या कल्याण डोंबिवली परिसरात स्मार्ट सिटीच्या विकास कामांना वेग आल्याचे दिसून येत आहे. मात्र अन्य आमदारांच्या मतदारसंघांना वगळून एक आमदार एक खासदार यांच्याच मतदारसंघात स्मार्ट सिटीची काम सुरू असल्याने मनसे आमदार राजू पाटील, भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी देखील संताप व्यक्त केला.

डोंबिवली रेल्वे स्थानकाला सॅटीस स्मार्ट सिटी अंतर्गत बनवण्याची मागणी आमदार पाटील यांनी केली होती. मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याने त्यांनी संताप व्यक्त केला आहे. फक्त ठराविक मतदारसंघांकडे लक्ष देऊन अन्य विधानसभा क्षेत्रांकडे दुर्लक्ष होत असल्याने उपस्थित दोन्ही आमदारांनी नाराजी व्यक्त केली आहे.

अमृत योजनेच्या कामाचे ऑडिट होणार !

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील २७ गावांमध्ये केंद्र शासनाच्या अमृत योजनेचं काम सुरू आहे. मात्र हे काम करत असताना ठेकेदाराने रस्ते खोदून जलवाहिन्या टाकल्या आहेत. त्यामुळे शासनाने तयार केलेल्या रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. त्यामुळे या ठेकेदाराची जबाबदारी आहे, कि रस्त्याची दुरुस्ती करून देणं अशी माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. तसेच संबंधीत ठेकेदाराच्या कामाचा देखील ऑडिट करण्याची मागणी पाटील यांनी बैठकीत केली. त्यानुसार या कामाचा लवकरच स्ट्रक्चरल ऑडिट केल जाणार असल्याची माहिती केडीएमसी कडून देण्यात आली. स्थानिक आमदारांना घेऊन सुरु असलेल्या अमृत योजनेच्या कामाचा दौरा करण्याच्या सूचना देखील केंद्रीय मंत्र्यांनी दिल्या आहेत.

लोकग्राम ब्रिजचे काम धीम्या गतीने !

कल्याण रेल्वे स्थानकाला लागून असलेल्या लोकग्राम ब्रिजचे काम हे धीम्या गतीने सुरु आहे. या पुलाची उभारणी हि रेल्वे कडून करण्यात येणार असून त्या संबंधीतीलं रक्कम कल्याण डोंबिवली महापालिकेकडून रेल्वेला सुपूर्द करण्यात आली आहे. मात्र या संदर्भात रेल्वेकडे पाठपुरावा केला जात नसल्याने पाटील यांनी नाराजी व्यक्त केली होती. या नंतर तातडीने या संदर्भात कल्याण डोंबिवली महापालिका पाठपुरावा करेल असं आश्वासन कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्तांकडून देण्यात आले आहे. केडीएमसी,एमएमआरडीए आणि रेल्वे प्रशासनामध्ये समन्वयाचा अभाव असल्याने हे काम संथ गतीने सुरु आहे. दिव्यातील डम्पिंग, भंडार्ली डम्पिंग,स्वच्छता गृह, वाहतूक कोंडी, अर्धवट पूल आधी समस्यांचा पाढा आमदार पाटील यांनी केंद्रीय राज्यमंत्री पाटील यांच्यासमोर वाचला. या संदर्भात केंद्रीय मंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारून दिव्याकडे लक्ष द्यायला हवं असं सूचित केले.

या वेळी जिल्हा परिषद अध्यक्ष पुष्पा पाटील, आमदार गणपत गायकवाड, निरंजन डावखरे, प्रमोद पाटील, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, नवी मुंबई महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर, कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे, मीरा-भाईंदर महानगरपालिका आयुक्त दिलीप ढोले, उल्हासनगर महापालिका आयुक्त अजीज शेख, भिवंडी महापालिकेचे आयुक्त विजयकुमार म्हैसाळ, ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते, जिल्हा प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!