“मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे” अभियानाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ

ठाणे दि. ३ : “मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे” या अभियानाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शनिवारी शुभारंभ झाला. स्वच्छ व सुंदर ठाणे, खड्डेमुक्त ठाणे व स्वच्छ शौचालय यांचा समावेश या अभियानात आहे. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, ठाण्याच्या सर्वांगिण विकासासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असून स्वच्छ आणि सुंदर ठाणे साकारण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यांनी “माझे ठाणे” ही भावना मनात ठेवून ठाण्याच्या विकासासाठी उत्कृष्ट दर्जाचे काम करावे, अशी अपेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी “मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे” अभियानाच्या शुभारंभ प्रसंगी व्यक्त केली. ठाण्याचा विकास हा वेगवान पध्दतीने होणार असून येत्या सहा महिन्यात ठाणे शहर हे खड्डेमुक्त, कचरामुक्त, स्वच्छ आणि सौंदर्यीकरणाने नटलेले दिसेल असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

राज्याची सेवा करण्याची संधी ठाणेकरांनीच दिली

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, हा दिवस माझ्यासाठी महत्त्वाचा व आनंदाचा दिवस आहे. विकासाचा शुभारंभ हा मुख्यमंत्री म्हणून आनंदाचा दिवस आहे. मला मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसण्याची व राज्याची सेवा करण्याची संधी ठाणेकरांनीच दिली आहे. ठाणेकरांनी ठाण्याच्या विकासात पुढे येऊन योगदान देणे आवश्यक आहे. ठाणेकर सुज्ञ आहेत. या ठाण्यावर बाळासाहेबांनी विशेष प्रेम केले आहे. बाळासाहेबांच्या काळातील दादोजी कोंडदेव स्टेडियम कात टाकतेय. या स्टेडियमच्या नुतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. वाड्यापाड्याचे टुमदार जुने ठाणे विकसित होत आहे. ठाण्यात भविष्याच्या दृष्टीने नवनवीन बदल होत आहेत. यामुळे ठाणेकरांना आधुनिक सेवासुविधा मिळत आहेत. ठाण्याचा सर्वांगिण विकास साधण्यासाठी नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा आहे.

ठाणे हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्हावे

मुंबईच्या जडणघडणीतसुद्धा ठाण्याचे वेगळे योगदान आहे. कोवीड काळात ठाण्यातील डॉक्टर, नर्स हे मुंबईत सेवा देत होते. राज्याचे, देशाचे वैभव असलेल्या मुंबईला साथ देणारे ठाणे हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्हावे, यासाठी सर्वांना प्रयत्न करायचे आहेत. हे शहर स्वच्छ, सुंदर, निरोगी, हिरवेगार असले पाहिजे. हे शहर आणखी हिरेवगार करण्यासाठी काय केले पाहिजे यावर विचार व्हावा. सार्वजनिक जागा, मंडई, मच्छी मार्केट, बागा हे कायमस्वरुपी स्वच्छ करुन त्यांचे सुशोभीकरण करावे. हे काम युद्ध पातळीवर करायचे आहे. शहरातील रस्ते, उड्डाणपूल हे यांत्रिकीकरणाद्वारे स्वच्छ झाले पाहिजे. शहराचे प्रवेशव्दार, भितीचित्रे, रस्ते दूभाजकांची रंगरंगोटीचे काम सुरु आहे. चांगल्या रस्त्यांवर लेन मार्किंग, उड्डाणपूलाचे सौंदर्यीकरण व्हायला हवे. लोकांना त्याचा आनंद घेता आला पाहिजे. यावर महापालिका काम करत आहे.

ठाण्याच्या विकासासाठी ६०५ काेटीचा निधी

ठाणे शहराच्या स्वच्छते सोबत, ही स्वच्छता करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांसाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी आपुलकीची भावना व्यक्ती केली. ते म्हणाले की, शहराच्या स्वच्छतेतील महत्त्वाचे योगदान असलेल्या सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्याबरोबर त्यांच्या संपूर्ण कुटुंबाची मोफत आरोग्य तपासणी महापालिकेमार्फत करण्याच्या सूचना महापालिकेला दिल्या आहेत. जनतेचा निधी जनतेसाठी आवश्यक असणाऱ्या सेवा सुविधापुरवण्यासाठी वापरण्यात यावा.ठाणे शहराच्या विकासासाठी ६०५ कोटींचा निधी दिला आहे. राज्य सरकार व महापालिका निधी देईल. मात्र अधिकाऱ्यांनी दर्जात्मक कामे करावे. यामध्ये कुठलेही कसूर करू नये विकास कामांना गती देण्याची क्षमता प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या हातात आहे.अधिकाऱ्यांनी त्या क्षमतेचा वापर करुन विकास कामांना गती द्यावी, अशी अपेक्षाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

या कार्यक्रमप्रसंगी आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रविंद्र फाटक, महापालिका आयुक्त अभिजीत बांगर, अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त 2 संजय हेरवाडे, माजी महापौर नरेश म्हस्के, मिनाक्षी शिंदे, माजी उपमहापौर पल्लवी कदम, माजी नगरसेवक देवराम भोईर, संजय वाघुले, मिलिंद पाटणकर, नारायण पवार, मनोहर डुंबरे, महापालिकेचे इतर अधिकारी/ कर्मचारी, माजी नगरसेवक उपस्थित होते.

असा होणार कायापालट…..

स्वच्छ व सुंदर ठाणे, खड्डेमुक्त ठाणे व स्वच्छ शौचालय यांचा समावेश या अभियानात आहे. ठाणे शहर सौंदर्यीकरणाअंतर्गत शहरातील प्रवेशद्वार (एन्ट्री गेटस्), शिल्पाकृतीसह चौक सुशोभिकरण, रस्ते सुशोभिकरण, भित्तीचित्रे, डिव्हायडर व कर्ब स्टोनची रंगरंगोटी, थर्मोप्लस्टिक पेंटद्वारे लेन मार्किंग व झेब्रा क्रॉसिंग, उड्डाणपुल, पादचारी पूल, खाडीवरील पूल, शासकीय इमारतींची रंगरंगोटी व विद्युत रोषणाई, मियावाकी तंत्रज्ञानाचा वापर करुन वृक्ष लागवड करुन स्वच्छतेसोबत सौंदर्यात भर पडणार आहे. तसेच 10.70 कि.मी रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण करणे, 55.68 कि.मी रस्त्याचे यू.टी.डब्ल्यू.टी पध्दतीने काम करणे व 75.44 कि.मी रस्त्यांचे डांबरीकरण पध्दतीने पुर्नपृष्ठीकरण करण्याचे काम करण्यात येणार आहे. शहरातील सर्व शौचालये 24 तास स्वच्छ ठेवणे, आवश्यक त्या सर्व शौचालयात केअरटेकर उपलब्ध करणे, शौचालयात सर्व मुलभूत सोयीसुविधांसह साधनसामुग्री उपलब्ध करणे. महापालिका मुख्यालयातील सर्व शौचालयातील आमूलाग्र बदल करणे आदी कामे प्रामुख्याने करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!