नाराज आमदारांची मंत्रिमंंडळात कि महामंडळावर वर्णी ?

मुंबई : राज्यात शिंदे़- फडणवीस सरकारच्या पहिल्या मंत्रीमंडळात संधी न मिळाल्याने अनेक आमदार नाराज झाले होते. गेल्या तीन महिन्यांपासून मंत्रीमंडळ विस्तार रखडल्याने  आमदारांची नाराजी वाढत आहे. मात्र डिसेंबर महिन्यात म्हणजेच हिवाळी अधिवेशनापूर्वीच मंत्रिमंडळ विस्तार होणार असून, त्याबरोबरच आता महामंडळ वाटपाची चर्चाही रंगली आहे. त्यामुळे गुलाबी थंडीत मंत्रिमंडळ विस्तार आणि महामंडळ वाटपच्या गरमा गरम चर्चेने नाराज आमदारांच्या चेह-यावर आनंद पसरला आहे. मात्र नाराज आमदारांना मंत्रीपद मिळणार कि महामंडळावरच समाधान मानावे लागणार याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.

शिवसेनेत झालेल्या बंडानंतर राज्यात  शिंदे – फडणवीस सरकार स्थापन झालं. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. ९ ऑगस्टला पहिला मंत्रीमंडळ विस्तार झाला, त्यावेळी शिंदे गटातील ९ आमदार आणि भाजपमधील ९ आमदार अशा १८ आमदारांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली.  मात्र पहिल्या मंत्रिमंडळात संधी न मिळाल्याने  अनेक आमदार नाराज झाले आहेत. त्यांची नाराजी अनेकवेळा समोरही आली. तीन महिने उलटूनही  मंत्रिमंडळ विस्तार रखडला आहे. मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होईल अशी चर्चा अनेक महिन्यांपासून सुरू आहे. मात्र मंत्रिमंडळ विस्ताराला मुर्हूत मिळत नसल्याने आमदारांची नाराजी वाढत चालली आहे. बंडानंतर स्थापन झालेल्या सरकाराला आमदारांची नाराजी ही  परवडणारी नाही. त्यामुळे आता डिसेंबर महिन्यात मंत्रिमंडळ विस्ताराबरोबरच महामंडळ वाटपाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. मोजक्याच लोकांना मंत्रिमंडळात स्थान देण्यापेक्षा महामंडळ देऊन खूष करता येईल का अशीही रणनिती आखली जात असल्याची चर्चा ऐकायला मिळते.

मंत्रिमंडळ विस्ताराइतकेच  महामंडळांचं वाटप महत्वाचं मानलं जातं. भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना या दोन पक्षांमध्ये महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला असून, भाजपकडे संख्याबळ जास्त असल्याने ६० टक्के तर बाळासाहेबांच्या शिवसेनेला ४० टक्के वाटा अशी चर्चा आहे.  राज्यात एकूण १२० महामंडळं आहेत.  यापैकी जवळपास ६० मोठी महामंडळं  मानली जातात.  यापैकी पहिल्या टप्प्यात याच ६० महामंडळांचं वाटप होणार आहे. यापैकी ६० टक्के म्हणजेच ३६  च्या आसपास महामंडळं भाजपच्या वाट्याला, तर २४ महामंडळं बाळासाहेबांच्या शिवसेनेला मिळणार असल्याची माहिती समेार येत आहे. हिवाळी अधिवेशनापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याची घोषणा करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

——–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!