पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी वादात सापडले आहेत त्यामुळे राज्यभरात कोश्यारी हटाव ची मागणी होत आहे. शुक्रवारी पुणे येथे स्वराज्य संघटनेचे प्रवक्ते धनंजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना काळे झेंडे दाखवून निषेध करण्यात आला. यामुळे संपूर्ण परिसराला पोलिस छावणीचे स्वरूप आले होते स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीराजे यांनी, काळे झेंडे दाखवले म्हणून स्वराज्य च्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले, मग कोश्यारी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करून उघड माथ्याने कसे फिरत आहेत ? असा खडा सवाल उपस्थित करत आमच्या दैवतांचा, महापुरुषांचा अवमान करून कोश्यारी उघड माथ्याने राज्यात फिरतात, त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही. उलट त्यांच्या वक्तव्याचा संविधानिक मार्गाने निषेध केला तरी पोलिस कारवाई करतात. हा कुठला न्याय आहे ? अशी संतप्त प्रतिक्रिया दिलेली आहे.