मुंबई : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेच्या विनामूल्य प्रशिक्षण प्रवेश अर्जाची मुदत 27 नोव्हेंबर 2022 रोजी रात्री 12.00 वाजेपर्यंत वाढविण्यात आल्याची माहिती राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था (SIAC) मुंबईचे संचालक डॉ. के. एस जैन यांनी दिली आहे.
उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था (SIAC), मुंबई, भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद, अमरावती व नागपूर, यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (YASHADA) संचलित डॉ. आंबेडकर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र (एसीईसी), पुणे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका (PCMC) संचलित सावित्रीबाई फुले ॲकॅडेमी, पुणे मार्फत केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा पूर्व परीक्षा 2023 साठी पूर्ण वेळ विनामूल्य प्रशिक्षण देण्याकरिता सामायिक प्रवेश परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुक पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने प्रवेश अर्ज भरण्याचा कालावधी दि. 4 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर असा होता. आता ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत दि. 27 नोव्हेंबर 2022 रोजी रात्री 12.00 वाजेपर्यंत वाढविण्यात आली आहे.
ही प्रवेश परीक्षा दि. 4 डिसेंबर 2022 रोजी ऑफलाईन पद्धतीने होणार असून याबाबतची सूचना www.siac.org.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. इच्छूक व पात्र उमेदवारांनी अर्ज करण्याचे आवाहन डॉ. के. एस जैन यांनी केले आहे.