पुणे – मराठी रंगभूमी, चित्रपटसृष्टी आणि हिंदी सिनेविश्वात आपल्या अभिनय कर्तृत्वाचा ठसा उमटवून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक विक्रम चंद्रकांत गोखले (वय ७७) यांचे प्रदीर्घ आजाराने खासगी रुग्णालयात निधन झाले. गेल्या २० दिवसांपासून विक्रम गोखले यांच्यावर पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु होते. डॉक्टरांनी त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली. मात्र, आज दुपारी विक्रम गोखले यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी वृषाली आणि कन्या असा परिवार आहे.
‘विक्रम गोखले यांचा जन्म ३० ऑक्टोबर, १९४७ रोजी झाला. अभिनयासोबतच त्यांनी लेखन आणि दिग्दर्शन देखील केले आहे, त्यांनी दिग्दर्शित केलेल्या आघात हा चित्रपटाचे समीक्षकांनी विशेष कौतुक केले. सन २०१३ साली प्रदर्शित झालेल्या अनुमती या चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले. विक्रम गोखले यांनी शेकडो हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे, मात्र संजय लीला भन्साळी यांच्या ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटातील ऐश्वर्याच्या वडिलांच्या भूमिकेतून ते अधिक प्रसिद्ध झाले. याशिवाय तुम बिन, भूल भुलैया, हिचकी, निकम्मा, अग्निपथ आणि मिशन मंगल यांसारख्या चित्रपटांमध्येही त्यांचा अभिनय चाहत्यांच्या पसंतीस पडला. नुकताच प्रदर्शित झालेला ‘गोदावरी’ हा त्यांचा अखेरचा सिनेमा ठरला.
विक्रम गोखले हे गोखले घराण्याच्या अभिनय परंपरेतील चौथ्या पिढीचे प्रतिनिधी होते. विक्रम गोखले यांचे वडील चंद्रकांत गोखले यांनी ७०हून अधिक हिंदी-मराठी चित्रपटांतून भूमिका केल्या आहेत. विक्रम गोखले यांच्या पणजी दुर्गाबाई कामत या भारतीय चित्रपट सृष्टीतल्या पहिल्या स्त्री अभिनेत्या, तर आजी कमलाबाई गोखले (तेव्हाच्या कमलाबाई कामत) या पहिल्या बाल-अभिनेत्री होत्या. इ.स. १९१३ साली दुर्गाबाईंनी दादासाहेब फाळके यांची निर्मिती आणि दिग्दर्शन असलेल्या ‘मोहिनी भस्मासुर’ नावाच्या चित्रपटात पार्वतीची आणि कमलाबाईंनी मोहिनीची भूमिका केली होती.