परीक्षेत कमी गुण मिळाल्याने सातवीत शिकणा-या मुस्कानचा गळफास
डोंबिवली – एका अकरा वर्षीय विद्यार्थीनीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना डोंबिवलीत घडली आहे. मुस्कान सिंग असे त्या विद्यार्थीनीचे नाव आहे. हिंदी विषयाच्या परीक्षेत कमी गुण मिळाल्याने व दिवाळीचा होमवर्क न केल्याने शिक्षकांकडून तिला ओरडा पडला होता. त्या तणावातून तिने जीवन संपविल्याची प्राथमिक माहिती समोर आलीय. मुस्कान ही नावाप्रमाणचे गोंडस होती. अभ्यासतही ती हुशार होती असे तिच्या शेजारी राहणा- यांनी सांगितले. मुस्कानच्या अकाली मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
डोंबिवली पूर्वेतील गोपाळ नगर,गल्ली नंबर 2 परिसरात मुस्कान राहत होती. गुरूवारी रात्री तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडलीय. मुस्कान ही मंजूनाथ शाळेत इंग्रजी माध्यम सातवी इयत्तेत शिकत होती. परीक्षेत हिंदी विषयात तिला कमी गुण मिळाले होते. तसेच दिवाळीचा गृहपाठ तिने केला नव्हता या कारणामुळे शाळेतील शिक्षक तिच्यावर रागावले होते शिक्षकांनी तिला मुख्याध्यापिकांकडे घेऊन गेले होते. .त्यावेळी मुख्याध्यापिकांनी तिला पालकांना शाळेत घेऊन येण्यास सांगितले होते. पालकांना शाळेत बोलावल्यानं ती तणावाखाली होती. मात्र आई वडीलांना याबाबत तिने काहीच सांगितले नव्हते. या तणाखालीच तिने आत्महत्या केल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली. याप्रकरणी रामनगर पोलिस अधिक तपास करीत आहेत.