कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडून मागील एक वर्षापासून पाणी बील वितरीत करण्यात आलेली नाहीत. पाणी बिले वितरीत करण्याची जबाबदारी सध्या कर विभागाकडे असून मे. एबीएम नॉलेजवेअर यांच्या चुकीमुळे करदात्या नागरिकांनात्यामुळे महापालिकेचे वार्षिक ८० कोटीचे नुकसान झाले आहे. यामुळे थकबाकीदार नागरिकांना पाणी देयक भरता आलेली नाहीत, मात्र त्यांच्यावर व्याजाचा अतिरिक्त बोजा वाढत आहे. त्यामुळे याला जबाबदार असणा-यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी कल्याणचे नागरिक मनोज कुलकर्णी यांनी पालिका आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
पालिकेकडून रहिवास व वाणिज्य पाणी देयके ही डिसेंबर २०२१ तर चाळीतील पाणी देयके एप्रिल २०२२ पासून आजपर्यंत वितरीत करण्यात आलेली नाहीत. पाणी बिले वितरीत करण्याची जबाबदारी सध्या कर विभागाकडे असून मे. एबीएम नॉलेजवेअर यांच्या चुकीमुळे करदात्या नागरिकांना व कल्याण डोंबिवली महापालिकेला आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. मात्र पालिकेचे अधिकारी आपली जबाबदारी नागरिकांवर ढकून मोकळे होत असल्याचेही पत्रात म्हटले आहे.
कंपनीचे कंत्राट रद्द करा
मे एबीएम नॉलेज वेअर ही कंपनी सेवानिवृत्त सनदी अधिकारी एस. के. सिंग यांची असल्याने महापालिका व महापालिकेतील अधिकारी पाठीशी घालत आहेत असा आरोप कुलकर्णी यांनी केला आहे. सदर कंपनीला महापालिकेने ३५ कोटी रूपयाचे संगणक प्रणाली अद्यावत करण्याचे कंत्राट दिल्यापासून पालिकेचा आर्थिक तोटा वारंवार सहन करावा लागत आहे. त्यामुळे या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन पाणी विभाग व कर विभाग यातील झारीतील शुक्राचार्य कोण आहेत, त्यांची चौकशी करावी व एबीएम कंपनीचे कंत्राट रद्द करून, त्यांचे कोणतेही बील अदा करण्यात येऊ नये अशी मागणीही कुलकर्णी यांनी निवेदनात केली आहे.