शेगाव, दि. 18 नोव्हेंबर : मागील आठ वर्षात देशात सामाजिक विषमता वाढीस लागली आहे. शेतकरी प्रचंड संकटात आहे, तरुण वर्ग नोकरीच्या शोधात आहेत पण त्यांचे प्रश्न सुटत नाहीत. त्यांच्या समस्या कोणी ऐकत नाही. मुलांच्या शिक्षणावर पालकांना लाखो रुपये खर्च करावे लागतात. मुले इंजिनिअरींगचे शिक्षण घेतात आणि  त्यांना एखादी खाजगी टॅक्सी चालवावी लागते किंवा किरकोळ काम करावे लागते. पालकांनी यासाठी एवढा खर्च केला का ? तरूण, शेतकरी उघड्यावर आहेत आणि दुसरीकडे याच हिंदुस्थानात काही मुठभर लोकच श्रीमंत होतात, असा हिंदुस्थान नको आहे आणि आम्ही तो होऊ देणार नाही, असा खा. राहुल गांधी यांनी ठणकावून सांगितले.

संत गजानन महाराज यांची पवित्र भूमी शेगाव येथे आज लाखो लोकांच्या अतिप्रचंड विशाल सभेला राहुल गांधी यांनी संबोधित केले.  या विशाल जनसभेत बोलताना राहुल गांधी म्हणाले की, शेतकरी जगाचा पोशिंदा आहे, त्याला आधाराची गरज आहे. पाऊस, अतिवृष्टी, चक्रीवादळ यात शेतक-याचे मोठे नुकसान होते पण त्यांना भाजपा सरकार मदत करत नाही, नुकसान भरपाई देत नाही. पीकविमाही मिळत नाही. शेतकरी 50 हजार, एक लाख रुपयांचे कर्ज काढतात पण ते माफ होत नाही आणि मोठ्या उद्योगपतींचे लाखो करोडो रुपयांचे कर्ज माफ होते. शेतकरी संकटात सापडतो, त्रस्त होतो तेव्हा तो जीवन संपवण्याचे टोकाचा निर्णय घेतो. युपीए सरकारने ऐतिहासिक कर्जमाफी केली पण आजचे सरकार शेतक-यांचा आवाज ऐकत नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व पंतप्रधान यांनी शेतक-याची पीडा, समस्या, दु:ख ऐकून घेतले तर एकही आत्महत्या होणार नाही.

कन्याकुमारीपासून ही पदयात्रा सुरू झाली असून जनतेचे ऐकून घेत आम्ही पुढे जात आहोत. मी तुमचे दुःख ऐकण्यासाठी आलो आहे. पण काही लोक हिंसा, द्वेष, भिती पसरवण्याचे काम करत आहेत. भीती, हिंसा, द्वेष यामुळे नुकसान होते, प्रेम, बंधुभाव अहिंसा याने  लोक एकछूट होतात. विरोधक विचारात की देशात कुठे आहे सिंसा, भीती, द्वेष ? असा प्रश्न विचारणा-या विरोधकांनी जर रस्यावर उतरून लोकांचा आवाज ऐकले तर मग कळेल की द्वेष, हिंसा, भिती कुठे आहे ? द्वेष व हिंसेने देशाचा फायदा होत नाही. महाराष्ट्र भूमी ही साधु, संत, महापुरुषांची भूमी आहे. यांनी लोकांना प्रेम दिले, लोकांना जोडण्याचे काम केले आम्हीही तेच करत आहोत. आम्ही देश जोडण्याचे काम करत आहोत. ज्या लोकांनी त्यांच्या आयुष्यात हिंसा अनुभवली आहे ते द्वेष पसवत नाहीत. शेतकरी, कामगार यांच्या मनात द्वेष असूच शकत नाही. महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमी. शिवाजी महाराज व आपण यांच्यात खूप फरक आहे,  ते महान होते, ते महाराष्ट्राचा आवाज होते. शिवाजी महाराज यांना त्यांच्या आई जीजाऊ यांनी मार्ग दाखवला त्या मार्गाने ते गेले म्हणून ते छत्रपती बनले.

महात्मा गांधी यांचे पणतू आणि मराठीतून भाषण करत जनतेला साद घातली,…ते म्हणाले, सकाळी मी राहुल गांधी यांच्याबरोबर पदयात्रेत चाललो, राहुल गांधी हे सामान्य जनता, गरीब, पिडीत लोकांचे दुःख हलके करण्याचे काम करत आहेत तर दुसरीकडे पंतप्रधान मोदी ज्या रस्त्याने जातात तिथली गरिबी दिसू नये म्हणून पडदे लावून गरिबीचे दृष्य झाकले जाते. महात्मा गांधी हे सुद्धा गरिबांच्या झोपडीत जात असत. दांडी मार्चमध्ये महात्मा गांधी, मोतिलाल नेहरू,पंडित नेहरू सहभाग झाले होते आणि आज मला राहुल गांधींसोबत चालण्याचे भाग्य लाभले. भारत जोडो यात्रेवर विरोधक  टीका करत आहेत. देश तुटला आहे का असा प्रश्न विचारणारे लोक देश तोडण्याची वाट पहात आहेत का ? असा सवाल करत, दृष्टा नेता तोच असतो ज्याला देश तुटण्याची चाहुल लागताच तो देश जोडण्यासाठी बाहेर पडतो. तुटल्यानंतर जोडण्याचे काम करण्याचे औचित्य काय ? असा सवाल त्यांनी केला.

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की,…जे जोडण्याचे काम करतात ते कायम राहतात, तोडणारे रहात नाहीत. राहुल गांधी सर्व धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन कन्याकुमारीपासून श्रीनगर पर्यंत निघाले आहेत. ‘डरो मत’ असे संदेश देत राहुल गांधी लोकांना आश्वस्त करत आहेत. लोकांच्या जीवनात काळोख निर्माण करणारे लोक केंद्रात आहेत पण राहुल गांधी मात्र तुमच्या जीवनात प्रकाश आणण्याचे काम करत आहेत. देशाच्या तिरंग्याचे, संविधानाचे, लोकशाहीचे रक्षण राहुल गांधी करत आहेत. त्यांच्या या कार्यात महाराष्ट्र भक्कमपणे उभा आहे.

विधिमंडळ काँग्रेस नेते व भारत जोडो यात्रेचे महाराष्ट्र समन्वयक बाळासाहेब थोरात यावेळी म्हणाले की, आजचा प्रसंग अविस्मरणीय आहे, एवढी प्रचंड सभा कधी झाली नाही. सभेला जमलेली ही उत्स्फुर्त गर्दी आहे.  राहुलजी पदयात्रेच्या माध्यमातून लोकांचे अश्रु पुसण्याचे काम करत आहेत, आपुलकी, जिव्हाळा , प्रेम वाटत ते निघाले आहेत व हजारो लोकांच्या साथीने संविधान, लोकशाही वाचवण्यासाठी ते निघाले आहेत. स्वातंत्र्यांची 75 वर्षे साजरी करत असताना लोकशाहीवर घाला घालण्याचे काम केले जात आहे. भारताचे भविष्य उज्वल करण्यासाठी भारत जोडो यात्रा निघाली आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात देश सुरक्षित राहील, त्यांच्या पाठीशी आपण उभे राहु असे आवाहन त्यांनी केले.

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण  म्हणाले की, ही प्रचंड सभा महाराष्ट्र व देशातील बदलणा-या परिवर्तनाचे संकेत आहेत. भारत जोडो यात्रा ही आगळीवेगळी पदयात्रा आहे कारण ही पदयात्रा हवेतून विमानाने निघालेली यात्रा नाही. महाराष्ट्रातून मध्यंतरी एक यात्रा गुजरात मार्गे गुवाहाटील गेली…. आणि काय डोंगुर, काय हाटील…..सर्व काही ‘ओके’ होते पण महाराष्ट्र व देशात सर्व काही ‘ओके’ नाही. भारत जोडो यात्रेची काही लोक टिंगळ उडवत आहेत पण त्याचा पदयात्रेवर काहीही परिणाम होणार नाही.  देशात आज बेरोजगारीचा प्रश्न महत्वाचा आहे. पदयात्रेत राहुल गांधी यांनी ह्या प्रश्नाला वाचा फोडताच भाजपा सरकार काही हजार नोक-यांची नियुक्ती पत्र वाटत आहे, हे याआधी झाले नव्हते.

छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मुकुल वासनिक, कन्हैयाकुमार , यशोमती ठाकूर या॔नीही जनतेला संबोधित केले. या सभेला राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेचे नेतेही उपस्थित होते. सभेसाठी विशाल व्यासपीठ उभे करण्यात आले होते , राहुल गांधी यांना व्यासपीठावर वारकरी परंपरेचे दर्शन दाखवणारे छोटीशी दिंडी काढण्यात आली होती. राहुल गांधींनी वारक-यांची पताका फडकवली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!