ठाणे – यंदा प्रथमच हॅरिस शिल्ड या मानांकित स्पर्धेसाठी ठाणे विभागाला प्रवेश देण्यात आला आहे. या संधीचे सोने करीत ठाण्यातील विविध शाळांच्या क्रिकेट टीम या स्पर्धेत आपली कामगिरी बजावत आहेत. विशेषतः वसंत विहार शाळेने चमकदार कामगिरी करीत सलग पाचवा सामना जिंकून या साखळी सामन्यात टॉप 8 मध्ये जाऊन पोचले आहेत.
हॅरिस शिल्ड स्पर्धेतील आजच्या पाचव्या राऊंडमध्ये वसंत विहार विरुध्द सिंघानिया असा सामना रंगला. सिंघानिया शाळेने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी निवडली. मात्र वसंत विहार शाळेच्या भेदक माऱ्यापुढे सिंघानिया टीम ढासळली. संपूर्ण टीम बाद होऊन केवळ 86 धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले. यात वसंत विहारच्या शुभम सावंत याने 4 विकेट्स घेतले तर दक्ष आणि प्रथमने प्रत्येकी 2 गडी बाद केले. तर 86 धावांचा पाठलाग करताना वसंत विहारने 7 गडी राखून सिंघानियाचा दारुण पराभव केला. यात सोहम किर याने नाबाद 50 धावा केल्या तर ऋग्वेद भोईर हा 15 धावा करून नाबाद राहिला. वसंत विहारच्या या सलग पाचव्या विजयाने या स्पर्धा साखळीत टॉप 8 संघात आपले स्थान बळकट केले.