डोंबिवली : गेल्या अनेक वर्षापासून खड्डयांनी त्रस्त असलेल्या डोंबिवलीकरांची आता खड्डयातून मुक्तता होणार आहे. एमएमआरडीएच्या अंतर्गत असलेले रस्ते काँक्रीटीकरण होणार असून आता पीडब्लूडी यांच्या माध्यमातून शहरातील रस्त्यांचे काँक्रीटीकरण होणार आहेत. डोंबिवलीतील महत्वाचे असलेल्या तीन रस्त्यांच्या कामांच्या ७० कोटीच्या निविदा काढण्यात आल्या आहेत. तसेच जिल्हयातील रस्त्यांचेही काँक्रीटीकरण होणार आहेत. त्यामुळे येत्या वर्षभरात डोंबिवलीसह ठाणे जिल्हयातील रस्ते खड्डेमुक्त होणार असून, लवकरच नागरिकांना चकाचक रस्ते मिळणार आहेत.

मागील आठवडयात एमएमआरडीएच्यावतीने खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण लोकसभा मतदार संघातील ४४५ कोटीच्या रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडले.  यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेल्या कल्याण डोंबिवली मधील सर्व रस्ते काँक्रीटचे करण्यात येणार असल्याची ग्वाही सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिली होती. त्यानुसार पीडब्लूडीच्या अंतर्गत असलेल्या रस्त्यांच्या कामांच्या निविदा काढण्यात आल्या आहेत.  

गेल्या दीड दोन वर्षापासून रस्त्यावरील खड्डयांच्या समस्येमुळे डोंबिवलीकर कंटाळलेले आहेत. मात्र डोंबिवलीचे आमदार रविंद्र चव्हाण यांच्याकडेच पीडब्लूडी खात्याचे मंत्री म्हणून जबाबदारी मिळाल्यानंतर डोंबिवलीकरांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. डोंबिवलीच नव्हे तर महाराष्ट्र खड्डेमुक्त करण्याचा मनोदय चव्हाण यांनी व्यक्त केलाय. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अख्यातरीत असलेल्या डोंबिवलीतील रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्याचे आदेश संबधित विभागाला दिल्यानंतर आता रस्त्यांच्या काँक्रीटीकरणासाठी ७० कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे. सुमारे ५ .१४ किमीचे रस्ते काँक्रीटीकरण करण्यात येणार आहेत,  ४२४० मीटर मंजूर लांबीपैकी आतापर्यंत  ९०० मीटरपर्यंतची काँक्रीटीकरणाची कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित रस्त्यांच्या कामांच्या निविदा काढण्यात आल्या आहेत. ही  कामे युध्दपातळीवर सुरू करण्यात येणार आहेत. तसेच उल्हासनगर उपविभागांतर्गत  कल्याण बदलापूर कर्जत रोड येथील उल्हासनगर आणि अंबरनाथ तालुक्यातील चार रस्त्यांची १०६ कोटीच्या कामांना मंजुरी  मिळाली आहे. तसेच कल्याण हाजीमंलग परिसरातही १२ कोटीची सिमेंट काँक्रीटची कामे होणार आहेत.  

आमणे- सावद बापगाव रस्ताचे काँक्रीटीकरणाचे काम प्रगतीपथावर

हे रस्ते सिमेंटचे होणार ..

कल्याण तालुक्यातील उल्हासनगर राष्ट्रीय महामार्ग क्र ७६ ते ८१ आणि ठाकुर्ली रेल्वे स्टेशन किमी रस्ता क्र. ७१  या रस्त्यांची एकूण लांबी १.८९ किमी आहे. मंजूर लांबी १४४० मी  असून त्यापैकी ४५० मीटरचे काँक्रीटरचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम करण्यात येणार असून, ३० कोटीच्या निविदा काढण्यात आल्या आहेत.

कल्याण तालुक्यातील पेंढारकर कॉलेज ते पाथर्ली डोंबिवली जिमखाना   रस्ता क्र ७२ हा रस्ता १.२० किमी असून मंजूर लांबी ७५० मीटर आहे. त्यापैकी ४५० मीटरचे काँक्रीटचे काम पूर्ण झाले असून,  १३ कोटी ८० लाखाचा निधी मंजूर करण्यात आला असून निविदा काढण्यात आल्या ओहत.  

कल्याण तालुक्यातील डोंबिवली रेल्वे स्टेशन ते सागाव मानपाडा  रस्ता क्र ७३ हा रस्ता २.०५ किमी रस्ता असून, मंजूर लांबी १०५० मीटर आहे. यासाठी २६ कोटी ९५ लाखाचा निधी मंजूर असून या कामाचे कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत.
—————————–

पीडब्लूडीकडून काँक्रीट रस्त्यांची कामे प्रगतीपथावर ..

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण साहेब आणि खासदार डॉ श्रीकांत शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार आणि पुढाकारामुळे ठाणे जिल्हयातील अनेक रस्ते काँक्रीटीकरण करण्यासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे.  डोंबिवलीतही ७० केाटीच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. ठाणे जिल्हयातही सिमेंटच्या रस्त्यांची कामे  सुरू आहेत. कल्याण वालधुनी पुलाजवळील सिमेंट काँक्रीटचे ३६ कोटीच्या कामांची मंजुरी मिळाली आहे. तसेच बदलापूर कर्जत रस्ता, भिवंडी वडपे रस्ता, आमने सावद बापगाव रस्ता तसेच कल्याण हाजीमलंग रस्ता हे सर्व रस्ते काँक्रीटीकरणाची होणार आहेत. रस्ते सिमेंट काँक्रीटचे झाल्याने ते दीर्घकाळ टिकतात. तसेच रस्त्यावर खड्डा पडत नाही. त्यामुळे नागरिकांना व वाहन चालकांना खड्डेमुक्त रस्ते मिळावे हा मानस आहे. रस्त्याच्या गुणवत्तेकडे विशेष लक्ष दिले जात असून, दर्जेदार कामे होत आहेत. पीडब्लूडीकडून युध्दपातळीवर कामांना सुरूवात झाली आहे. अनेक रस्त्यांची कामे पूर्ण झाली असून, उर्वरित कामे प्रगतीपथावर आहेत, येत्या वर्षभरात नागरिकांना सिमेंट काँक्रीटचे चकाचक रस्ते मिळतील. (विलास कांबळे,  अधिक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, ठाणे )

—————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!