ग्रंथप्रेमींनी संमेलनात सहभागी व्हावे : जिल्हाधिका-यांचे आवाहन
ठाणे, दि. १५ : ग्रामीण व शहरी भागातील लोकांमध्ये वाचनसंस्कृतीची वाढ व्हावी, यासाठी महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरणाअंतर्गत उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, ठाणे जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय व कल्याणच्या सार्वजनिक वाचनालयाच्या संयुक्त विद्यमाने कल्याणमधील पारनाका येथील आनंदी गोपाळ सभागृह, अभिनव विद्यामंदिर येथे येत्या शनिवारी दि. 19 व रविवारी, 20 नोव्हेंबर, 2022 रोजी ठाणे ग्रंथोत्सव-2022 चे आयोजन करण्यात आले आहे. ग्रंथप्रेमी नागरिक, विद्यार्थी, साहित्यिकांनी या संमेलनात उत्स्फुर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा ग्रंथोत्सव समितीचे अध्यक्ष अशोक शिनगारे यांनी केले आहे.
ग्रंथप्रेमींना एकाच ठिकाणी विविध ग्रंथ प्राप्त व्हावेत तसेच प्रकाशक व ग्रंथ विक्रेता यांना ग्रंथ विक्रीसाठी एकाच ठिकाणी आवश्यक ती सुविधा उपलब्ध व्हावी, ग्रंथांचा प्रचार व प्रसार व्हावा या उद्देशाने हा ग्रंथोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या ग्रंथोत्सवाच्या निमित्त विविध साहित्यिक व सांस्कृतिक कार्यक्रम, ग्रंथ प्रदर्शन व विक्रीचे आयोजनही करण्यात आले आहे.
ग्रंथोत्सवाची सुरुवात शनिवार दि, 19 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 वाजता ग्रंथ दिंडींने होणार आहे. सकाळी 11 वाजता ग्रंथोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. याच दिवशी दुपारी 2.30 वाजता ‘समाज माध्यमांचे वाचक चळवळीवरील परिणाम’ या विषयावर परिसंवाद होणार आहे. या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी डॉ.विलास पवार असून यामध्ये नितिन केळकर, निकीता भागवत, मंजुषा सहाणे हे सहभागी होणार आहेत. सचिन आमडोस्कर हे सूत्रसंचालन करणार आहेत. त्यानंतर दु. 4 वाजता कथाकथनाचा कार्यक्रम होणार असून अध्यक्षस्थानी चांगदेव काळे असणार आहेत. प्राची गडकरी, करुणा कल्याणकर व सुरेश पवार हे यात सहभागी होणार आहेत.
दुसऱ्या दिवशी दि. 20 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता ‘महिलांचे मराठी साहित्यातील योगदान’ याविषयावरील परिसंवादात चंद्रशेखर भारती व प्रा. ऋचा खापर्डे हे सहभागी होणार असून अध्यक्षस्थानी प्रा.स्वप्ना समेळ असणार आहेत. या परिसंवादाचे सूत्रसंचालन मुग्धा घाटे करणार आहेत.
दुपारी 2.30 वा. काव्य संमेलन होणार आहे. या काव्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध कवी अरुण म्हात्रे असणार आहेत. यात सुरेखा गावंडे, स्वाती नातू, सुरेखा गायकवाड, दीपश्री इसामे, आदित्य दवणे, संकेत म्हात्रे, प्रकाश धानके, कृष्णतेज, शितल पाचर्णे, विजय गायगवळी, संदीप राऊत, गोविंद नाईक, माधव डोळे, संदेश ढगे, किरण येले हे सहभागी होणार आहेत. सायंकाळी 4 वाजता होणाऱ्या समारोप कार्यक्रमात ठाणे जिल्ह्यातील आदर्श ग्रंथपालांचा व उत्कृष्ठ ग्रंथालयांचा सत्कार करण्यात येणार आहे.
दोन्ही दिवसांच्या साहित्यिक कार्यक्रमांना ग्रंथप्रेमींनी उपस्थित रहावे व ग्रंथोत्सवात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन ग्रंथोत्सव समितीचे सदस्य सचिव व जिल्हा ग्रंथालय अधिकारी प्रशांत पाटील यांनी केले आहे.