भिवंडीत यंत्रमाग कारखान्याला भीषण आग
भिवंडी : भिवंडी शहरालगतच्या सोनाळे औद्योगिक वसाहतीत शुभलक्ष्मी फॅब्रिक्स या अत्याधुनिक यंत्रमाग कारखान्यास गुरुवारी पहाटे भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत कारखान्यातील कापडाच्या मोठा साठ्यासह कोट्यवधी रुपयांचीयंत्रसामुग्रीही जळून खाक झाली आहे. भिवंडी शहरातील भादवड गावा शेजारील सोनाळे हद्दीत मोठ्या प्रमाणावर अत्याधुनिक यंत्रमाग व्यवसाय फोफावला असुन येथील तरे कंपाऊंड शेजारील सर्व्हे क्रमांक १११ या ठिकाणी शुभलक्ष्मी फॅब्रिक्स प्रा. लि. हा यंत्रमाग कारखाना आहे. या कारखान्यात ३६ रेपियर जकार्ट हे अत्याधुनिक यंत्रमाग असुन पहाटेच्या सुमारास अचानक आग लागली. काही क्षणातच आगीने उग्ररुप धारण केल्याने संपुर्ण कारखान्यातील यंत्रसामुग्री, कच्चा तसेच तयार कपडा जळुन खाक झाला आहे. या आगीची माहिती कामगारांनी कारखाना मालक मधुसुदन तापडीया यांना देताच त्यांनी भिवंडी अग्निशामक दल व तालुका पोलिस स्टेशनशी संपर्क साधला. अग्निशामक दलाच्या दोन गाड्या व एक पाण्याचा टॅंकर घटनास्थळी दाखल झाले. आग मोठ्या प्रमाणात पसरल्याने त्यांनी मदतीकरीता कल्याण महानगरपालिका अग्निशामक दलास पाचारण केले. त्यानंतर तीन तासाच्या अथक प्रयत्नाने आग आटोक्यात आणली.दरम्यान या आगीचे कारण स्पष्ट झाले नसून ही आग लागताच कारखान्यामधील कामगारांनी बाहेर पलायन केल्याने सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. या आगीत कोट्यवधी रुपयांची यंत्रसामुग्रीसह कच्चा तसेच तयार कपड्यांचा मोठा साठा जळुन खाक झाला आहे. या आगीच्या घटनेची नोंद तालुका पोलीस ठाण्यात केली आहे.