डोंबिवली (प्रतिनिधी) : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते डोंबिवलीतील ४४५ कोटीच्या रस्त्याच्या कामांचे भूमीपुजन होत आहे. मात्र गेल्या ३ वर्षात अनेक वेळेला या कामासाठी मंजूर करण्यात आलेल्या निधीबाबत शहरभर लावण्यात आलेले फलक आणि गेली अनेक वर्षे / दशके रस्त्याबाबत सहन केलेला त्रास….याविषयी डोंबिवलीकरांनी एका पत्राद्वारे तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केलीय. मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, खासदार डॉ श्रीकांत शिंदे सर्व राजकीय पक्षातील नगरसेवक यांना खुले पत्र लिहिले आहे, या पत्रात तीन सवाल विचारण्यात आले असून, भूमीपुजनाआधी याची उत्तरे देण्यात यावी अशी मागणीही त्या पत्रात करण्यात आलीय.
ही माहिती आज आपण देऊ शकणार नसाल तर हा भूमिपूजन सोहळा आमच्यासाठी शून्य महत्वाचा असेल. कारण निधी मंजूर होऊन २ वर्षे उलटून गेल्यानंतरही ही माहीती मिळत नसेल तर नागरिकांच्या दृष्टीने या कार्यक्रमाला काडीचीही किंमत नाही. अशी भावना डोंबिवलीकरांनी पत्राद्वारे व्यक्त केली असून हे पत्र सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहे. त्यामुळे डोंबिवलीकरांच्या भावनेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दखल घेतात का, याकडे लक्ष वेधलय.
सोशल मिडीयावर व्हायरल झालेले पत्र जसेच्या तसे ….
माननीय मुख्यमंत्री आणि इतरांना विघ्नसंतोषी डोंबिवलीकरांकडून खुले आणि विस्तृत पत्र
दिनांक १३.११.२०२२
प्रति,
श्री एकनाथ शिंदे,
माननीय मुख्यमंत्री,
महाराष्ट्र राज्य
प्रति,
श्री देवेंद्र फडणवीस,
माननीय उपमुख्यमंत्री,
महाराष्ट्र राज्य
प्रति,
श्री रविंद्र चव्हाण,
माननीय मंत्री,
महाराष्ट्र राज्य
प्रति,
श्री श्रीकांत शिंदे,
माननीय खासदार,
भारत सरकार,
प्रति,
सर्व माननीय माजी नगरसेवक, विरोधी पक्ष नेते
प्रति,
ज्यांचे नगरसेवक नाहीत राजकीय पक्षांचे प्रमुख,
प्रति,
डोंबिवली भर पसरलेले राजकीय दादा, भाई, किंग, वझीर वगैरे वगैरे….
विषय – आज दिनांक १३.११.२२ रोजी आपल्या हस्ते होणाऱ्या रस्त्यांच्या कामाच्या भूमिपूजन कार्यक्रमानिमित्त सदिच्छा आणि त्याबाबत काही माफक अपेक्षा कळविणेबाबत.
संदर्भ – गेल्या ३ वर्षात अनेक वेळेला या कामासाठी मंजूर करण्यात आलेल्या निधीबाबत शहरभर लावण्यात आलेले फलक आणि गेली अनेक वर्षे / दशके आम्ही रस्त्याबाबत सहन केलेला त्रास.
सन्माननीय महोदय,
सुरुवातीला प्रति म्हणून अक्षरशः सगळ्यांची नावं टाकली आहेत, कुणाचाच इगो दुखावला जाऊ नये म्हणून हा खटाटोप.
गेली अक्षरशः अनेक दशके खराब रस्ते ही आमची प्रमुख समस्या आहे. अनेक सरकारे आली, अनेक आघाड्या आल्या, अनेक प्रकारच्या जोड्या असलेल्या युत्या झाल्या…पण आमच्या या समस्येवर समाधान काही कोणाला देता आलेलं नाही. तसं बघितलं तर कल्याण डोंबिवली महापालिकेबाबत म्हणाल तर गेली अनेक वर्षे सत्ता विशिष्ट पक्षांकडे आहे, पण २५ / ३० वर्षांचा हिशोब केला तर त्यातही सगळे येऊन गेले आहेत.
असो… मूळ मुद्दा हा आहे की अनेक समस्यांमध्ये असलेल्या रस्ते समस्येबाबत तुम्ही घेतलेला निर्णय अभिनंदनीय असला तरी डोंबिवली मध्ये भूतकाळात असे अनेक निर्णय – भूमिपूजनाचे कार्यक्रम होईनही रस्ते मात्र झालेले नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. शिवाय तुमच्या आपापसात असलेल्या इगो वॉर मुळे नगरिकांच्या मूलभूत गरजांकडे होणाऱ्या अक्षम्य दुर्लक्षाबाबत आणि होणाऱ्या आर्थिक नुकसानाबाबत तुम्हा सर्व राजकीय नेत्यांनी विचार करण्याची गरज आहे.
फक्त ३ मुद्दे मांडतो…
मुद्दा क्रमांक एक – अक्षम्य असा वाया गेलेला वेळ.
उद्या ज्या रस्त्यांचे भूमिपूजन होणार आहे त्या रस्त्यांसाठी निधी मंजूर झाल्याची तारीख आहे ८ डिसेम्बर २०२१. त्या आधी म्हणजे भाजप आणि शिवसेना युतीचे सरकार असताना १६ सप्टेंबर २०१९ रोजी काही प्रमाणात निधी मंजूर झाला आणि त्याचेही विविध ठिकणी भूमिपूजनाचे सोहळे झाले. मंजूर झालेला निधी आणि त्या कामाचे भूमिपूजन यात २-३ वर्षांचा वाया गेलेला वेळ याची जबाबदारी कोणाची?
मुद्दा क्रमांक दोन – खड्डे भरण्यासाठी अतिशय निकृष्ट दर्जाच्या मालाचा वापर आणि करोडो रुपयांचा केलेला चुराडा.
गेली अनेक वर्षे डोंबिवलीमध्ये एक विशिष्ट पॅटर्न सेट झाला आहे. साधारण पावसाळ्याच्या आधी, गणपतीच्या आधी, किंवा तुमच्या सारख्या बड्या नेत्याच्या आगमनापूर्वी डोंबिवलीमध्ये खड्डे बुजविण्याचे काम जोर धरते. आता याला महापालिकेने “रस्त्याचे मजबुतीकरण” असे गोंडस नाव दिलेले आहे. कसले डोंबलाचे मजबुतीकरण. अक्षरशः ठिगळे लावली जातात. अत्यंत निकृष्ट दर्जाचे डांबर, खडी आणि कामातील ढिसाळपणा यामुळे सर्व रस्त्यांची अक्षरशः वाट लावलेली आहे. गेल्या ६ वर्षात या अशा निकृष्ट कामासाठी महापालिकेने शेकडो करोड रुपये खर्च केल्याची माहिती मिळते. कराच्या रुपात मिळालेल्या पैशांचा असा झालेला चुराडा डोंबिवलीकर दर वर्षी बघत असतो. याबाबत कोणाला जबाबदार धरणार???
मुद्दा क्रमांक ३ – आज होणाऱ्या भूमिपूजन कार्यक्रमात आम्हाला हवीच असलेली माहिती. च मुद्दाम लावला आहे.
डोंबिवली मधील प्रमुख रस्ते बनविण्यासाठी महापालिका, MMRDA, MIDC आणि PWD या चार विभागांचा संबंध येत आहे. म्हणजे, काही रस्ते १००% महापालिका करेल, काही महापालिका आणि इतर तीन संस्था मिळून करतील असे अभिप्रेत आहे. आत्ता पर्यंतचा अनुभव असा आहे, की या तीनही संस्था आणि महापालिका यांच्यात काडीचाही समन्वय नाही. हा अक्षरशः नेहमीचा अनुभव आहे.
आज तुम्ही भूमीपूजन करून जाल आणि मग नंतर या तिन्ही संस्था एकमेकांकडे बोटं दाखवत वेळ वाया घालवतील. त्यासाठी आम्हा डोंबिवलीकरांच्या काही स्पष्ट मागण्या आहेत त्या खालीलप्रमाणे.
उद्धाटनाच्या दिवशी सर्व नागरिकांना खालील माहिती मिळायलाच हवी…
१. कोणत्या रस्त्याचे काम नक्की कधी सुरू होणार आणि कधी संपणार, याबाबत तारखा निहाय तपशील. आणि KDMC, MMRDA, MIDC आणि PWD यापैकी कोणता विभाग नक्की काय करणार याबाबत माहिती.
२. संबंधित काम करणाऱ्या कंत्राटदाराचे नाव आणि क्रमांक. तसेच त्याला दिलेल्या कामाचा तपशील. (कंत्राटदार नक्की झालाच नसेल आत्ता भूमिपूजन करण्यामागे हेतू काय?)
आणि
३. काम दिलेल्या वेळेत चालू आणि पूर्ण न झाल्यास जबाबदारी कोणाची असेल?
वरील माहिती आज आपण देऊ शकणार नसाल तर हा भूमिपूजन सोहळा आमच्यासाठी शून्य महत्वाचा असेल. कारण निधी मंजूर होऊन २ वर्षे उलटून गेल्यानंतरही ही माहीती मिळत नसेल तर नागरिकांच्या दृष्टीने या कार्यक्रमाला काडीचीही किंमत नाही.
तरी, आज आपण आपल्या भाषणातून या तिन्ही गोष्टींबाबत नागरिकांना माहिती द्याल अशी माफक अपेक्षा करतो आणि विराम देतो.
आपले विनम्र
डोंबिवली मधील विघ्नसंतोषी दक्ष नागरिक.
सूचना:-
हे पत्र सर्वसामान्य डोंबिवलीकराच्या भावना पोहचविण्यासाठी असून, आज तुमच्या आजूबाजूला असलेल्या स्थानिक कार्यकर्त्यांच्या मनातही हीच भावना आहे हे लक्षात असुद्या.
डोंबिवली मधला एखादा नाराज गट वगैरे समजून या मागण्यांकडे दुर्लक्ष करू नका. नजीकच्या काळात महापालिकेच्या निवडणुका येत आहेत.