मुंबई : महाराष्ट्रात महिला अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. बेरोजगारीही वाढली आहे. शेतक-यांसोबतही धोका झालेला आहे, अशा परिस्थितीत सर्व पीडितांच्यावतीने मी मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागतोय, असे सांगत बहुजन समाज पक्षाचे राष्ट्रीय समन्वयक आकाश आनंद यांनी आगामी सर्व निवडणुकांमध्ये बसपाला विजयी करण्याचे आवाहन केले.
मुंबईतील माटुंगा इथल्या षण्मुखानंद सभागृहात आयोजित ‘होऊ शकत है’ अभियानाअंतर्गत ‘शासक बनो’ अंतर्गत ‘पोलिंग बूथ ते पार्लियामेंट’ अभियानाचा प्रारंभ आकाश आनंद यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी, राष्ट्रीय महासचिव अशोक सिद्धार्थ, महाराष्ट्र प्रभारी नितीन सिंह, राष्ट्रीय समन्वयक खासदार रामजी गौतम, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अँड. संदीप ताजने यांच्यासह प्रदेश कमिटीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाराष्ट्रात बहुजन विरोधी सरकार सत्तेत आहे. महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कार देण्यासाठीचं नुसतं नाटक महाराष्ट्र सरकार करत आहे. फुले दांपत्यांना भारतरत्न देण्यासाठी राज्य सरकार केंद्राला पत्र लिहिते, पण पुढे काहीच होत नाही, असा आरोप आकाश आनंद यांनी यावेळी केला. महाराष्ट्रात आजही ३ लाख लोकं बेघर आहेत. शेतक-यांनाही महाराष्ट्र सरकारनं धोका दिलेला आहे. महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून मागील वर्षभरात ५६ हजार महिला अत्याचाराच्या केसेस नोंद झाल्याचे त्यांनी सांगितले.
बसपाचे प्रदेशाध्यक्ष संदीप ताजने यांनी २०२४ मध्ये महाराष्ट्रातून २५ आमदार आणि ५ खासदार निवडून आणण्याचं उद्दिष्ट सर्वांसमोर ठेवले. जातीचं राजकारण निर्माण करणा-यांना मूठमाती देण्याचा इशाराही अँड. ताजने यांनी यावेळी दिला. बसपाचे महाराष्ट्र प्रभारी नितीन सिंह यांनी बसपाच्या हाती सत्ता देण्याची गरज आहे. आगामी काळात जे महाराष्ट्रात होईल. उत्तरप्रदेशमध्येही होईल तेच देशात होईल, असे सांगून विजयाचा निर्धार केला. यावेळी राष्ट्रीय समन्वयक आणि महाराष्ट्र प्रभारी डॉ. अशोक सिद्धार्थ तसेच बसपा खासदार तथा राष्ट्रीय समन्वयक रामजी गौतम यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.