दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ न्यायमूर्ती धनंजय यशवंत चंद्रचूड (Dhananjay Yashwant Chandrachud) यांनी आज देशाचे ५० वे सरन्यायाधीश (Chief Justice) म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांनी त्यांना राष्ट्रपती भवनात शपथ दिली. न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड हे १० नोव्हेंबर २०२४ पर्यंत दोन वर्षांसाठी या पदावर असतील.
चंद्रचूड यांनी न्यायमूर्ती उदय उमेश ललित यांची जागा घेतली आहे. ११ ऑक्टोबर रोजी न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांची उत्तराधिकारी म्हणून त्यांनी शिफारस केली होती. न्यायमूर्ती चंद्रचूड यांना जून १९९८ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने वरिष्ठ वकील म्हणून नियुक्त केले होते आणि त्याच वर्षी अतिरिक्त सॉलिसिटर जनरल म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. २९ मार्च २००० ते ३१ ऑक्टोबर २०१३ या कालावधीत ते मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते.
न्या. धनंजय चंद्रचूड यांचा जन्म ११ नोव्हेंबर १९५९ रोजी महाराष्ट्रात एका मराठी कुटुंबात झाला आहे. त्यांचे वडील यशवंत विष्णू चंद्रचूड हे भारताचे सरन्यायाधीश होते. आई प्रभा चंद्रचूड या शास्त्रीय गायिका आहेत. त्यांचे शालेय शिक्षण मुंबईत कॅथेड्रल अँड जॉन कॉनन स्कूल व दिल्लीतील सेंट कोलंबाज स्कूलमध्ये झाले. त्यानंतर त्यांनी नवी दिल्लीत सेंट स्टिफन्स कॉलेजमधून अर्थशास्त्र व गणित विषयात पदवी मिळवली. १९८२ मध्ये दिल्ली विद्यापीठात एलएलबी पदवी केल्यानंतर १९८३ मध्ये त्यांनी हार्वर्ड विद्यापीठात एलएलएम केले. हार्वर्डमध्ये त्यांच्या यशाबद्दल त्यांना जोसेफ बेल पारितोषिक लाभले. त्यानंतर तेथेच त्यांनी ‘ज्युरिडिकल सायन्सेस’ या विषयात डॉक्टरेट मिळवली. १९८८ ते ९७ मध्ये वकिली करत असताना त्यांनी मुंबई विद्यापीठात ‘कम्पॅरॅटिव्ह कॉन्स्टिट्युशनल लॉ’ या विषयाचे अध्यापन केले.