मुंबई, दि. ६ : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या उध्दव ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके या विजयी झाल्या आहेत. लटके यांना तब्बल ६६,५३० मते मिळाली. शिवसेनेच्या फुटीनंतर ही पहिलीच निवडणूक असल्याने शिवसेना ताकदीनिशी उतरली हेाती. मशाल भडकली, भगवा फडकला अशी प्रतिक्रिया पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या विजयानंतर दिली.

शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या अंधेरी पूर्व येथील विधानसभेच्या जागेसाठी ३ नोव्हेंबर रोजी मतदान पार पडले.  शिवेसेनेचे दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना  शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून निवडणूक रिंगणात उतरविण्यात आले होते. दरम्यानच्या काळात शिवसेनेत फूट पडली.  एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदारांनी स्वतंत्र गट स्थापन करून भाजपशी हातमिळवणी करीत राज्याची सत्ता स्थापन केली. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री बनले. त्यांनंतर उध्दव ठाकरे विरूध्द एकनाथ शिंदे गट असा संघर्ष रंगल्याचे दिसून आले. कोर्टापर्यंत हा संघर्ष जाऊन ठेपला. दोन्ही गटाने शिवसेना नाव आणि धनुष्य बाणावर दावा केल्याने शिवसेनेचे नाव आणि धनुष्य बाण चिन्ह गोठविण्यात आले. अखेर शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना आणि ढाल तलवार हे चिन्ह मिळालं तर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे आणि मशाल चिन्ह मिळालं. ऋतुजा लटके यांनी मशाल चिन्हावर निवडणुक लढवली. 

या पोटनिवडणुकीसाठी  सुमारे ३१.७४  टक्के मतदान झाले. या मतदार संघात एकूण मतदान २, ७१, ५०२  इतकं आहे. त्यापैकी ८४,१६६ इतकं मतदान झालं.  निवडणुकीत एकूण सात उमेदवार रिंगणात  होते त्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके आणि इतर अपक्ष असेच सहा उमेदवार रिंगणात होते.  या पोटनिवडणुकीसाठी  भाजपकडून मुरजी पटेल यांना उमेदवारी देण्यात आली होती मात्र भाजपने उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने मुरजी समर्थकांमध्ये तीव्र नाराजी पसरली होती. मात्र या निवडणुकीत पडद्यामागून ‘नोटा’ला मत टाका, असा प्रचार केला गेला असल्याची चर्चा ंरगली हेाती. 

 सकाळी ८ वाजेपासून मतमोजणीस सुरुवात झाली. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या गुंदवली मनपा शाळेमध्ये मतमोजणी पार पडली. एकूण १९ फे-या पार पडल्या पहिल्या फेरीपासूनच ऋतुजा लटके या आघाडीवर होत्या.  मात्र नोटाला दुस-या क्रमांकाची मते मिळाल्याचे दिसून आले.   या मतमोजणीसाठी २०० अधिकारी व कर्मचारी कार्यरत होते. तर  कायदा व सुव्यवस्थेसाठी मुंबई पोलीस दलाचे ३०० अधिकारी व कर्मचारी आणि इतर सुरक्षा यंत्रणाही तैनात होते.

—————

नोटाला जी मतं पडली, तीच मतं विरोधकांना पडली असती ;  उद्धव ठाकरे यांचा भाजपसह शिंदे गटाला टोला

ऋतुजा लटके यांच्या विजयानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मशाल भडकली, भगवा फडकला अशी प्रतिक्रिया पत्रकार परिषदेत दिली.  जनता आमच्यासोबत असल्याचे आजच्या निकालाने स्पष्ट झालंय. लढाईची सुरूवातच विजयाने झाली आहे. या पुढेचे देखील सर्व विजय मिळवेन. आमचं नाव आणि चिन्ह गोठवलं. परंतु, ज्या निवडणुकीसाठी चिन्ह गोठवलं ती निवडणूकच विरोधकांनी लढवली नाही. चिन्ह कुठलं पण असो जनता आमच्यासोबत आहे.  पराभवाचा अंदाज आल्याने त्यांनी माघार घेतली. शिवाय नोटाला जी मतं पडली तीच मतं विरोधकांना पडली असती, असा टोला उद्धव ठाकरे यांनी यावेळी भाजपसह शिंदे गटाला लगावला.  

उद्धव ठाकरे यांनी भाजपसह पंतप्रधान नरेंद्र मोदींवर देखील टीका केली. “जमिनीवरचे प्रकल्प गुरजरातला गेले आणि हवेतले प्रकल्प महाराष्ट्रात आले. परंतु, आता गुजरातची निवडणूक जाहीर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं महाराष्ट्र प्रेम उफाळून आलं आणि त्यांनी महाराष्ट्रासाठी काही हवेतील प्रकल्प देण्याची घोषणा केली, असा टोला ठाकरे यांनी लगावला.   


उमेदवारांना मिळालेली मते 
१) ऋतुजा रमेश लटके (पक्ष – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) : ६६,५३०
२) बाला व्यंकटेश नाडार (पक्ष – आपकी अपनी पार्टी ) : १,५१५
३) मनोज श्रावण नायक (पक्ष – राईट टू रिकॉल पार्टी) : ९००
४) नीना खेडेकर (अपक्ष ) : १,५३१
५) फरहाना सिराज सय्यद (अपक्ष ) : १,०९३
६) मिलिंद कांबळे (अपक्ष ) : ६२४
७) राजेश त्रिपाठी (अपक्ष ) : १,५७१ नोटा : १२,८०६
*एकूण मते : ८६,५७०*
*अवैध मते – २

विजयानंतर ऋतुजा रमेश लटके यांना प्रमाणपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करताना निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी  प्रशांत पाटील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!