ठाणे : पुढील वर्षी ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या गणेशमूर्तींवर पूर्णत: बंदी असून, शाडू मातीच्या पर्यावरणपूरक घटकांपासून तयार केलेल्या गणेशमूर्तींची खरेदी – विक्री करणे बंधनकारक असणार आहे. मात्र, या वर्षी राज्य सरकारने कोविड कालावधीनंतर झालेल्या गणेशोत्सवासाठी विशेष बाब म्हणून ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या श्री गणेशमूर्तींना परवानगी दिली होती. त्यामुळे ठाण्यातील बहुतांश मूर्तिकारामध्ये अजूनही संभ्रम कायम असून, राज्य सरकारने गणेशमूर्तीबाबत योग्य निर्णय तातडीने द्यावा, अशी मागणी ठाण्यातील गणेशमूर्तिकारांनी केली आहे. 

ठाण्यातील सुभाषनगरमध्ये नुकतीच गणेशमूर्तिकारांची बैठक झाली. या बैठकीत ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’ किंवा शाडू मातीच्या गणेशमूर्तीच्या परवानगीबाबतचा निर्णय राज्य सरकारने लवकरात लवकर जाहीर करावा, जेणेकरून मूर्तिकारांना पुरेसा वेळ मिळेल, या विषयावर चर्चा झाली. सरकारने ऐनवेळी निर्णय घेतल्यास मोठे नुकसान होण्याची भीती यावेळी बहुतांश गणेशमूर्तिकारांनी व्यक्त केली. राज्य सरकारने गणेशमूर्तिकारांच्या कलेला योग्य न्याय द्यावा. आमच्या उदरनिर्वाहाचे हे एकमेव साधन असल्याने आयत्या वेळी निर्णय घेऊ नये, अशी एकमुखी मागणी ठाणे श्री गणेश मूर्तिकार उत्कर्ष संघटनेचे अध्यक्ष प्रवीण भोसले, उपाध्यक्ष मिलिंद मोरे, सचिव दीपक भोरे, सहसचिव आशिष केळुसकर, खजिनदार अभिजित नलावडे, विजय बोळिंजकर आणि घनश्याम कुमार यांनी केली आहे. 

शाडू मातीच्या गणेशमूर्ती घडविण्यासाठी प्रचंड मेहनत लागते. गणेशमूर्तीसाठी माती राजस्थान आणि गुजरातहून मागवावी लागते. या गणेशमूर्ती तयार करण्यासाठी कारागीरही मोठ्या प्रमाणावर लागतील. त्यामुळे प्लास्टर ऑफ पॅरिस किंवा शाडू मातीच्या गणेशमूर्तीच्या परवानगीबाबतचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लवकरात लवकर जाहीर करावा. - अरुण बोरीटकर, सल्लागार, ठाणे श्री गणेश मूर्तिकार उत्कर्ष संघटना

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!