मुंबई : एकिकडे अख्खा देश, महाराष्ट्र दिवाळीच्या आनंदात असताना, दुसरीकडे शेतक़-यांच्या डोळयात पाणी आहे. हाता तोंडाशी आलेला घास परतीच्या पावसाने हिरावल्याने दिवाळी कशी साजरी करायची या चिंतेत बळीराजा आहे. त्याच पार्श्वभूमीवर शेतक-यांना धीर देण्यासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज औरंबाद दौरा केला. शेतक-यांच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त भागाची त्यांनी पाहणी करीत त्यांच्या व्यथा, जाणून घेत त्यांच्याशी संवाद साधला. शेतक-यांना हेक्टरी ५० हजार रूपये मदत तातडीने जाहीर करा. अन्यथा विरोधी पक्ष म्हणून नव्हे तर शेतक-यांचा आवाज म्हणून मी स्वत: रस्त्यावर उतरेन असे उध्दव ठाकरे यांनी शिंदे़- फडणवीस सरकारला ठणकावून सांगितले.
औरंगाबाद जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांची माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेट घेतली.गंगापूर तालुक्यातील दहेगाव आणि पेंढापूर या गावातील नुकसानग्रस्त भागातील उद्धव ठाकरे यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. पावसाने पीक हिरावल्याने शेतक-यांची दिवाळी अंधारात आहे. वावरात इतकं पाणी भरलयं की डोळयातल पाणी आटलयं अशा ह्द्रयद्रावक शब्दात शेतक-यांनी व्यथा मांडली. सगळी पिकं वाहून गेली सरकारकडून कोणतीही आर्थिक मदत मिळालेली नाही अशी व्यथा शेतक-यांनी ठाकरेंसमोर मांडली. मी तुम्हाला धीर द्यायला आलो आहे मी तुमच्या सोबत आहे असे आश्वासन ठाकरे यांनी शेतक-यांशी संवाद साधताना दिला. एका शेतक-यांच्या हातात आसूड होता. त्यावेळी ठाकरे यांनी हा आसूड ओढायला शिका असेही म्हणाले. काही करा पण आत्महत्या करू नका असे आवाहनही ठाकरे यांनी शेतक-यांना केले.
हे उत्सवी सरकार …
उध्दव ठाकरे पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले की, आजची माझी भेट प्रतिकात्मक आहे खर तर ओला दुष्काळ जाहीर करायला हवा होता. या सरकारकडे भावनाचा दुष्काळ आहे. कृषिमंत्री आले नाही, मुख्यमंत्री आले नाही. हे उत्सवी सरकार आहे, उत्सवमग्न सरकार आहे. फक्त उत्सव साजरे करत आहे. मी उत्सव साजरे करा असं म्हणत नाही. पण उत्सव साजरे करत असताना आपल्या राज्यातील जनता समाधानी आहे की नाही, हे पाहण्याचे काम सरकारचे आहे. हे सरकार अपयशी ठरत आहे’ अशी टीका उद्धव ठाकरेंनी सरकारवर केली.