मुंबई : महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ आणि रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडिया (RAI) यांच्या दरम्यान बॅचलर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन (BBA) या अभ्यासक्रमासाठी सामंजस्य करार करण्यात आला. विद्यार्थ्यांना या उपक्रमाद्वारे बिझनेस आणि रिटेलचे आवश्यक ज्ञान आणि उद्योगाचा अनुभव मिळेल. महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा. डॉ. अपूर्वा पालकर, डॉ. लॉरेन्स फर्नांडिस, गौतम जैन, मीनाक्षी चुडामणी यांच्यासह रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या रिटेल लर्निंगच्या प्रमुखांच्या उपस्थितीत सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली.

महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचा प्रारंभ ऑगस्ट २०२२ मध्ये झाला. विद्यापीठाने रोजगाराभिमुख कार्यक्रमांसाठी उद्योगाशी भागीदारी सुरू केली आहे. आता सुरू होत असलेल्या रिटेल उद्योगाशी संबंधित अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकत असतानाच कमावण्याची आणि अनुभव मिळविण्याची संधी मिळेल. हा कोर्स स्टोअरच्या विद्यमान विक्री कर्मचार्‍यांसाठी देखील असेल. तीन वर्षांच्या शेवटी विद्यार्थ्यांना सहाय्यक स्टोअर व्यवस्थापकांच्या प्रोफाइलमध्ये किरकोळ विक्री उद्योग क्षेत्रात संधी मिळेल.

१२ वी पूर्ण केलेल्या सर्वांसाठी हा अभ्यासक्रम असेल. विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट, डिप्लोमा, अॅडव्हान्स डिप्लोमा आणि डिग्री प्रोग्रामचा पर्याय असेल. हा कोर्स पदवीधरांना किरकोळ विक्री उद्योगासंदर्भात (रिटेल ईन्डस्ट्री) आवश्यक कौशल्ये प्रदान करेल. विद्यापीठाने नुकतेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स, सायबर सिक्युरिटी, मशीन लर्निंग, बिझनेस इंटेलिजन्स आणि इनोव्हेशन, न्यू व्हेंचर मॅनेजमेंट मधील टेक्नॉलॉजी डोमेनमधील अभ्यासक्रम सुरू केले आहेत. विद्यार्थ्यांना रोजगारक्षम बनवणारे अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यासाठी विद्यापीठ उद्योगाशी संलग्न आहे.

रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडिया (RAI) ही भारतीय किरकोळ विक्रेत्यांची संस्था आहे. भारतातील आधुनिक रिटेल उद्योगाच्या वाढीसाठी योग्य वातावरण निर्माण करण्यासाठी ही संस्था सर्व भागधारकांसोबत काम करते. या सामंजस्य कराराद्वारे RAI मोठ्या किरकोळ विक्रेत्यांशी जॉब ट्रेनिंग, इंडस्ट्री फॅकल्टी आणि प्लेसमेंट सपोर्ट प्रदान करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करेल. RAI ने किरकोळ विक्री उद्योगाच्या शिक्षणासंदर्भात कौशल्य सामग्री तयार केली आहे आणि ते शैक्षणिक संस्था आणि उद्योगांना उपलब्ध करुन देत आहेत.

कुलगुरू डॉ अपूर्वा पालकर म्हणाल्या की, “रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडियासोबतचा हा सामंजस्य करार पदवीधारकांना किरकोळ विक्री क्षेत्रातील आवश्यक कौशल्ये मिळविण्यास मदत करेल.  उद्योगाशी संबंधित अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यासाठी विद्यापीठ कटीबद्ध आहे. रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार राजगोपालन म्हणाले की, तरुणांना रोजगाराच्या बाबतीत मदत करण्यासाठी विद्यापीठासोबतचे हे सहकार्य अत्यंत आवश्यक पाऊल आहे. किरकोळ उद्योग, महाराष्ट्र राज्य आणि राज्यातील तरुणांच्या भविष्यासाठी हे सकारात्मक पाउल असेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!