सोमवारी मतदान : देशभरात ९८०० प्रतिनिधी बजावणार मतदानाचा हक्क
मुंबई : काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी सोमवारी सकाळी १० वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होणार आहे. दुपारी ४ वाजेपर्यंत मतदानाची वेळ निश्चित करण्यात आली आहे. यासाठी देशभरातील ४० केंद्रांवर ६८ बूथ उभारण्यात आले आहेत. यामध्ये विविध राज्यांचे प्रतिनिधी असलेले सुमारे ९८०० मतदार सहभागी होणार आहेत. या निवडणुकीत मल्लिकार्जुन खर्गे व शशी थरूर असे दोन उमेदवार असून, या दोघांमध्ये चुरस निर्माण झालीय.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष पदाच्या निवडणूकीसाठी सोमवारी मतदार होणार आहे. यासाठीची सर्व तयारी झाली आहे. देशभरातील सर्व राज्यांमध्ये हे मतदान होणार असून महाराष्ट्रातही मतदानाची पूर्ण तयारी झालेली आहे. प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे मतदानाचे केंद्र असून तीन बूथवर सकाळी दहा ते दुपारी चार या वेळेत राज्यातील ५६१ प्रदेश प्रतिनिधी आपला मतदानाचा हक्क बजावू शकतात. या निवडणुकीसाठीचे प्रदेश निवडणूक निर्णय अधिकारी, माजी केंद्रीय मंत्री पल्लम राजू सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी दिनेश कुमार, नरेंद्र रावत, आ. कृष्णा पुनिया हे मतपेट्या घेऊन मुंबईत आले आहेत. आज त्यांनी टिळक भवन येथील मतदान केंद्रांची पाहणी केली. जे प्रदेश प्रतिनिधी मतदार आहेत, त्यांना अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने बारकोड असलेले ओळखपत्र दिलेले आहे. ते ओळखपत्र आणि दुसरे कुठलाही फोटो पुरावा ओळखपत्र जसे की मतदान कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, बँक पासबुक यापैकी एक अशी दोन्ही ओळखपत्रे दाखवल्यानंतर मतदारांना मतदान करता येणार आहे. मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान प्रक्रियेत सहभागी होऊन आपला मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन प्रदेश निवडणूक अधिकारी पल्लम राजू यांनी केले आहे.
राज्यात ५६१ प्रतिनिधी बजावणार मतदानाचा हक्क
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदाची निवडणूक सोमवारी होणार आहे. या निवडणुकीची सर्व तयारी पूर्ण झाली असून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्यालय टिळक भवन येथे सकाळी दहा ते दुपारी चार या वेळेत मतदान पार पडणार आहे. राज्यातील ५६१ प्रदेश प्रतिनिधी आपला मतदानाचा हक्क बजावू शकतात. सोनिया गांधी, मनमोहन सिंग, प्रियांका गांधी आणि इतर CWC सदस्य काँग्रेस मुख्यालयातील बूथवर मतदान करतील. भारत जोडो यात्रा शिबिरात एक बूथ देखील तयार करण्यात आला आहे, जिथे राहुल गांधी आणि सुमारे ४० मतदार मतदान करतील. मल्लिकार्जुन बेंगळुरू आणि शशी थरूर तिरुअनंतपुरम येथील प्रदेश काँग्रेस कार्यालयात मतदान करणार आहेत.
१३७ वर्षाच्या इतिहासात अध्यक्षपदासाठी सहाव्यांदा चुरस
काँग्रेस अध्यक्षपदाच्या या निवडणुकीत गांधी घराण्यातील एकही सदस्याने भाग घेतलेला नाही. त्यामुळे यंदाचा काँग्रेसचा अध्यक्ष हा गांधी घराण्याबाहेरील सदस्य असणार आहे. काँग्रेसच्या 137 वर्षांच्या इतिहासात अध्यक्षपदासाठी सहाव्यांदा अंतर्गत निवडणुका होत असून चुरस निर्माण झालीय.