शिवसेनेकडून दोन तर भाजपकडून एक अर्ज दाखल
मुंबई ; अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके आणि भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांनी आज उमेदवारी अर्ज सादर केले. यावेळी दोन्ही पक्षांकडून शक्तीप्रदर्शन करण्यात आल. त्यामुळे मशाल विरुद्ध कमळ असा सामना रंगणार आहे.
मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाननंतर अखेर मुंबई महापालिकेने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा स्वीकारला. तसं पत्र सुद्धा लटके यांना महापालिकेकडून देण्यात आलं आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून दोन फॉर्म भरण्यात आले आहेत. प्रतिष्ठेच्या बनलेल्या राजकीय लढाईत कोणतीही चूक होऊ नये यासाठी ठाकरे गटाकडून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाने सावध पवित्रा घेतला आहे. ऋतुजा लटके यांच्यासोबत संदीप नाईक यांनी देखील फॉर्म भरला आहे. कोणत्याही कारणास्तव दगाफटका होऊ नये यामुळे फॉर्म भरण्यात आला आहे. दुसरीकडे, मुरजी पटेल यांच्यासोबत भाजचे दिग्गज नेते तसेच कार्यकर्ते उमेदवारी अर्ज भरण्यासाठी रवाना झाले आहे. भाजपकडूनही जोरदार शक्तीप्रदर्शन केलं.
शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या अंधेरी पूर्व येथील विधानसभेच्या जागेसाठी ३ नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. शिवसेनेत फूट पडल्याने दोन गट पडले आहेत. त्यामुळे उध्दव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे गट असा लढा सुरू झाला आहे. शिवसेना पक्ष आणि धनुष्य बाण निशाणी वर दोन्ही गटाने दावा केल्यानंतर निवडणूक आयोगाने धनुष्य बाण चिन्ह गोठवले असून, शिवसेना नावही वापरण्यास मनाई केली आहे. २०१९ मध्ये विधानसभेची जागा शिवसेनेच्या वाट्याला आल्यावर मुरजी पटेल यांनी अपक्ष ही निवडणूक लढवली. २०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीत अंधेरी पूर्व मतदारसंघात जवळपास १ लाख ४७ हजार ११७ मतदान झाले होते. त्यापैकी रमेश लटके यांना ६२ हजार ७७३ मतं मिळाली. तर मुरजी पटेल यांना ४५ हजार ८०८ मतं होती.
निवडणूक आयोगाकडून उध्दव ठाकरे गटाला शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे हे नाव दिलं असून, मशाल ही निशाणी दिलीय. तर एकनाथ शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव आणि ढाल-तलवार’ हे चिन्ह दिलं आहे. मात्र या पोटनिवडणुकीत शिंदे गटाने उमेदवार दिला नसून भाजपला पाठींबा दर्शविला आहे. राज्यात भाजप आणि शिंदे गटाची युती आहे. तर शिवसेना उध्दव ठाकरे गटाच्या उमेदवाराला कॉंग्रेस राष्ट्रवादीने पाठींबा दिला आहे त्यामुळे महाविकास आघाडी हि निवडणूक एकत्रपणे लढणार आहे या सर्व पार्श्वभूमीवर ही निवडणूक चांगलीच रंगतदार ठरणार असल्याचे दिसून येतय.