मुंबई : बीडमधील सावरगाव येथील भगवान भक्तीगडावर भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांचा विराट दसरा मेळावा पार पडला. यावेळी पंकजा मुंडे यांनी मिशन २०२४ च्या तयारीची घोषणा केली. “माझ्या नाराजीची चर्चा बंद करा, कोणीही नाराज नाही. 2024 साली विधानसभेला पक्षाने तिकीट दिलं तर तयारीला लागणार आहे. कार्यकत्यांनी तयारीला लागा असे आवाहन मुंडे यांनी लाखो जनसमुदायासमोर केले.
पंकजा मुंडे पुढे म्हणाल्या की, संघर्ष कुणालाच चुकलेला नाही. छत्रपतींनाही संघर्ष करावा लागला. संघर्षाचा काळ प्रत्येकाच्या आयुष्यात असतो. पण मी थकणार नाही आणि कुणासमोर झुकणारही नाही असा इशाराच त्यांनी दिला.“काळात प्रवाहाविरोधात ज्या पक्षात कुणीच जात नव्हतं, त्या पक्षात गोपीनाथ मुंडे कमळाचं फुल हातात घेऊन आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत लढले. त्यांचा संघर्ष कमी झाला का? ४० वर्षांच्या राजकारणात केवळ साडेचार वर्षे सत्ता मिळाली. हा संघर्ष कमी आहे का? त्या गोपीनाथ मुंडेंचा संघर्ष आपल्यासमोर आहे,” असेही पंकजा मुंडे यांनी म्हटलं.