डोंबिवली : राज्याची सांस्कृतीक उपराजधानी आणि सुशिक्षित शहर म्हणून ओळख असलेल्या डोंबिवलीचा विकासाबाबत आजही डोंबिवलीकरांमध्ये नाराजीचा सूर आहे. काही दिवसांपासून डोंबिवली द डेड सिटी असा मजकूर सोशल मिडीयावर चांगलाच फिरत आहे त्यातून डोंबिवलीकरांची नाराजीची भावना दिसून येत आहे. काय आहे तो मेसेज वाचा …हा मेसेज वाचल्यानंतर आपल्या भावना जरूर कळवा .
नमस्कार.
मी डोंबिवली द डेड सिटी, डोंबिवली.
तशी वाघासाठी, कमळासाठी, घड्याळासाठी, हातासाठी, इंजिनासाठी, आयुक्तांसाठी, यांच्यासाठी, त्यांच्यासाठी, सगळ्यांसाठी मी स्मार्ट सिटी आहे असं म्हणतात ब्वा !
महाराष्ट्रातलं पहिलं आणि भारतातलं दुसरं संपूर्ण साक्षर शहर असा किताब मी एकेकाळी मिरवला होता. माझं भवितव्य उज्वल आहे असं त्यावेळी सगळ्यांनाच वाटलं होतं , पण वाटणं आणि प्रत्यक्ष होणं /असणं यात जमीन आसमानाचा फरक आहे, नाही का दादा !
गुढीपाडव्याच्या स्वागत यात्रेची नांदी मीच केली होती. जिमखाना ग्राउंड वरचा सुप्रसिद्ध उत्सवही माझाच आणि सावळाराम संकुलातला आगरी महोत्सवही माझाच.शं न्नाही माझे, पु. भा. भावेही माझे, फडके रोडही माझा, दिवाळी पहाटही माझी, गद्रे बंधू, कुलकर्णी ब्रदर्स, राकेश ज्वेलर्स, प्रकाश हार्डवेअर हेही माझेच.सावित्रीबाई फुलेही माझंच, सिबोही माझं, सुयशही माझं, मेट्रो जंक्शन, सोनार पाडा, मानपाडा, एक्सपीरिया, शिळफाट्यापर्यंत सगळं सगळं माझंच की हो !
पण मी कोणाची माहित्ये ? मी टक्केवारीची.
‘टक्के बोला मला ओरबाडा’ असा एक कलमी कार्यक्रम सगळ्यांनी राबवला, अगदी सगळ्यांनी मिळून. सगळ्यांचेच नगरसेवक, आमदार, खासदार एकाच ताटात जेवणारे पण खाल्ल्या मिठाला जागणारे मात्र नाहीत. खाल्ल्या मिठाला जागणार फक्त कार्यकर्ता. तोच लढणार, तोच रडणार, तोच मारणार, आणि तोच मरणारही. गंमत म्हणजे तोंड लपवायची वेळ आली, की ते ही तोच लपवणार कारण त्याच्यात अजूनही थोडी शिल्लक आहे.
मी आई आहे इथल्या लेकरांची, पण माझी कूस फाडायचं कामही माझ्या लेकरांनीच केलंय. अमाप पैसा, प्रसिद्धी, पदं मिळवलेली ही लेकरं माझे लचके तोडताना कुठलीच कसर ठेवत नाहीत, काय सांगू तुम्हाला ?
काय सांगू तुम्हाला इथल्या रस्त्यांबद्दल; की थेट खड्ड्यांबद्दलच सांगायला घेऊ ? घर ते स्टेशन, स्टेशन ते घर असा प्रवास दररोज करणारे याबद्दल जास्त विस्ताराने बोलू शकतील. ते ज्या दिवशी बोलतील त्या सुवर्ण दिनाची मी वाट बघते आहे. स्कूल बस मधून ये-जा करणारी चिमणी पाखरं या खड्ड्यांमुळे इतकी मेटाकुटीला आली आहेत की काय सांगावं ! एका शाळेच्या मुख्याध्यापकांनी तर त्यांच्या अकराच्या अकरा स्कूल बसेसच्या मागे इकडच्या स्थानिक प्रशासनाची कान उघडणी करणारे पोस्टर्स लावले होते. पण त्याचा परिणाम शून्य होणार हे मला पक्कं माहीत होतं.
आपापल्या घराबाहेरच्या गल्ल्या सिमेंट काँक्रीटच्या केल्या की माझं नेता नावाचं लेकरू निर्र्धास्त होतं .मग कधी कोणी केंद्रीय मंत्री मला म्हणून जातो की, ‘इतकं गलिच्छ शहर मी पाहिलेलं नाही’.याच खड्ड्यांना वैतागून कधी कोणी लोकसभा प्रभारी भिवंडी पर्यंत बोटीने प्रवास करतो.तर कधी कोणी दहीहंडीच्या दिवशी रात्रीच्या अंधारात बोटीने येतो, आणि त्याचंच लेकरू माझी लोकसभा सांभाळतं आहे हे ऐकल्यावर तर अश्रूंनी पदर भिजतो माझा !
परवा दिवशी तर गंमतच झाली. माझी एक लेकुरवाळी माहेरवाशीण गौरींना म्हणून आली इथे. तिची लेकरं आता वयात आलेली, नव मतदार झालेली. मात्र अजूनही त्यांची सगळ्यांची नावं इथल्याच मतदार यादीत बरं का ! स्टेशन ते भोईरवाडी असा प्रवास करेपर्यंत जी शहराची अवस्था या नवतरुणांनी पाहिली, ‘आई, This is a dead city’ हे त्यांचं पहिलं वाक्य होतं.
माहेरवाशिण चपापली, कळवळली माझ्यासारखी. मला म्हणाली, ‘आई काय गं हे? सगळं कसं विदिर्ण, सुतकी, उदास वाटतंय इथे ! सुशोभीकरण तर जाऊच दे पण तुझ्या किमान गरजा तरी पुरवतात का हे लोक’ ?
काय बोलणार होते मी आणि कोणाबद्दल ? कोणा पुढे जाणार होते माझ्या नशिबाची फाटकी झोळी घेऊन ठिगळं लावायला !महापौरांकडे की आयुक्तांकडे ?माझ्या रवींद्रकडे की रमेशकडे की यशोदा होऊन लाड केलेल्या श्रीकांतकडे? कुठल्या प्रतिष्ठीत डॉक्टर, वकील, सीए, व्यापाऱ्याकडे ?की आदर्श डोंबिवलीकर पुरस्कार घेतलेल्या लेकरांच्या दारात ?
दरवेळी कूस उजवताना वाटायचं हे लेकरू आधार देईल, मी त्याला इथवर आणलं इथून पुढे ते मला घेऊन जाईल. पण असं झालं नाही बघ कधी.
आता पुन्हा निवडणुका लागणार आहेत. पुन्हा माझी ही सगळी लेकरं हात जोडून हसत माझ्यापुढे येतील आणि पुन्हा मी ही त्यांना तोंड भरून आशीर्वाद देईन.
मी आहे त्यांची.
मी नाही विसरणार.कधीच.
मी नाही विसरणार.कधीच.