ठाणे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंतापदी देवेंद्र पवार यांच्या नियुक्तीचा घाट ?
मुंबई (प्रतिनिधी) :- राज्यातील सार्वजनिक बांधकाम खात्यातील अधिकाऱ्यांनी बदल्यांसाठी कोणत्याही राजकीय नेत्यांच्या शिफारशी तसेच दबाव आणू नयेत असे स्पष्ट आदेश राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविन्द्र चव्हाण यांनी दिले असतानाच तसेच मी नियमबाहय, मुदतबाहय बदल्या करणार नसल्याचे सांगितले असतानाही, स्वत:स्वत:च्याच आदेशांची कशी पायमल्ली करत आहेत याचा गजब किस्सा उघड झाला आहे. विशेष म्हणजे एक वर्षांपूर्वीच ठेकेदारांना त्यांच्या हक्काची बिले देण्यासाठी वेठीस धरल्याने नाशिकच्या लाचलूचपत प्रतिबंधक खात्याच्या कारवाईत तीन लाखांची लाच घेताना रंगेहात पकडलेल्या व संपूर्ण महाराष्ट्रात हे प्रकरण गाजलेल्या लाचखोर कार्यकारी अभियंता देवेंद्र पवार यांना मुख्यमंत्र्यांच्या ठाणे विभागातील अधीक्षक अभियंता या पदावरील नियुक्तीसाठी भाजप नेत्यांनी फिल्डिंग लावली आहे.
सध्या मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्हयात हजारो कोटींची महत्त्वाकांक्षी विकासकामे प्रस्तावित असून, त्यातील काही सुरुही झाली आहे. सध्या हया पदावर असलेल्या अधीक्षक अभियंत्याचा बदलीचा कालावधीही पूर्ण झालेला नाही. तरीही त्यांची बदली करण्याचे घाट असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून कळते. तथापि, मुंबईतील महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधीक्षक अभियंता पदी असलेले, भाजपशी सलगी असणारे व नाशिकच्या लाचखोरी प्रकरणात गुन्हा दाखल झालेले देवेंद्र पवार हे राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मलईदार पोस्टींगसाठी सक्रीय झाल्याचे भाजपा केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या शिफारस पत्रावरुन स्पष्ट होत आहे. कपिल पाटील यांनी पवार यांची रस्ते विकास महामंडळ (MSRDC) येथील अधीक्षक अभियंता पदी झालेली नियुक्ती रद्द करुन त्यांना अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, ठाणे येथे नियुक्ती देण्याची मागणी लेखी पत्राद्वारे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केल्यानंतर तात्काळ पारदर्शक व स्वच्छ कारभाराची खात्री देणारे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सदर लाचखोर अधीक्षक अभियंत्याची ठाणे येथे पदस्थापना करण्याबाबत अपर मुख्य सचिव (बांधकाम) यांना तात्काळ निर्देश देवून सदर नस्ती अंतिम स्वाक्षरीसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठविण्याबाबत कार्यवाही करण्यास सांगितले असल्यामुळे एका अर्थाने भ्रष्टाचाराला प्रोत्साहनच दिले असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
विशेष म्हणजे भाजपचेच मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांनी व शिंदे गटाचे अंबरनाथचे आमदार डॉ.बालाजी किणीकर त्याचप्रमाणे भिवंडीचे आमदार शांताराम मोरे यांच्यासह अनेक आमदारांनी सध्या कार्यरत असलेले अधीक्षक अभियंता विलास कांबळे हे ठाणे जिल्हयात उत्तम काम करीत असून त्यांनी रखडलेल्या प्रकल्पांना चालना देण्याचे काम केले आहे. त्यांना ठाणे जिल्हयाच्या भौगोलिक परिस्थितीचा सखोल अभ्यास असल्यामुळे, तसेच हजारो कोटींचे नवीन प्रकल्प मार्गी लावण्यासाठी तसेच त्यांचा ठाण्यातील कार्यकाळ पूर्ण झालेला नसल्यामुळे त्यांना आहे त्या पदावरच ठेवण्यात यावे अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सार्वजनिक बांधकाम मंत्री रविन्द्र चव्हाण यांचेकडे केल्याचे समजते.
दरम्यान नाशिक येथील ठेकेदारांच्या बाबतीत घडलेल्या हया लाचलूचपत प्रकारामुळे ठाणे जिल्हयातील ठेकेदारही धास्तावले आहेत. याबाबत काही ठेकेदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्या कानावर ही बाब टाकली असून, याबाबत मुख्यमंत्री काय भूमिका घेतात याकडे संपूर्ण ठाणे जिल्हयातील ठेकेदारांचे लक्ष लागून राहिले आहे.