ठाणे,(प्रतिनिधी) :  कोपरी परिसरातील नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. त्यामुळे अनेक नागरिकांनी पाणी खेचण्यासाठी विजेच्या मोटर बसविल्या आहेत. त्यामुळे विजेचे बिल जादा येत असतानाच, आता पाण्याची जादा बिले महापालिकेने धाडली आहेत. त्यामुळे हजारो रुपयांच्या वीज व पाणीबिलांचे शुक्लकाष्ठ कोपरीवासियांच्या मागे आहे,

शहरातील इतर भागाप्रमांणेच कोपरी व चेंदणी कोळीवाडा परिसरातही मीटरद्वारे पाणीपुरवठ्याची अवाच्या सव्वा बिले आल्यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत. भाजपाचे माजी नगरसेवक भरत चव्हाण व भाजयुमोचे प्रदेश सचिव ओमकार चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली कोपरीवासियांनीही  एल्गार पुकारला असून, तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. तर वेळप्रसंगी मीटर उखडून टाकण्याचा निर्धारही केला आहे.

कोपरी व चेंदणी कोळीवाडा परिसरात बहुतांशी मध्यमवर्गीय नागरिक वास्तव्य करीत आहेत. या भागातील नागरिकांना किमान १५०० रुपये पाणीबिल येत होते. मात्र, अचानक मीटरद्वारे केल्या गेलेल्या पाणीपुरवठ्याबद्दल किमान सहा हजार रुपयांपासून ५० हजार रुपयांपर्यंत बिले आकारण्यात आली आहेत. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने अचानक बिले पाठविल्यामुळे कोपरीत संतापाची लाट उसळली. कोणत्याही परिस्थितीत नागरिकांवरील अन्याय सहन करणार नाही, असा इशारा भाजप नेत्यांनी महापालिका प्रशासनाला दिला. महापालिकेच्या महासभेत मीटरनुसार आकारण्यात येणाऱ्या बिलांविरोधात निर्णय घेण्यात आला होता. मात्र, महापालिका प्रशासनाने मुजोरीने ही पद्धत लादली. या प्रकरणी महापालिका आयुक्तांना निवेदन देण्यात येईल. त्यानंतरही प्रशासनाने निर्णय न घेतल्यास वेळप्रसंगी मीटर उखडून टाकू, असा इशारा माजी नगरसेवक भरत चव्हाण यांनी दिला.

कोपरीतील काही भागात अजूनही पाणीपुरवठा अपुरा होतो. यापूर्वी सुमारे १३० ते १५० रुपये मासिक बिलांची आकारणी होत होती. आता काही नागरिकांना चक्क ५० हजार रुपये बिल पाठवण्यात आले आहे. यापूर्वी पाणीमीटर लावून, तर आता बिल देऊन कोट्यवधींचा भ्रष्टाचार सुरू आहे, असा आरोप भाजयुमोचे सचिव ओमकार चव्हाण यांनी केला. पाणीमीटरची तपासणी करण्यासाठी अधिकारी फिरकत नाहीत. एका नागरिकाला ९ हजार रुपयांचे बिल आले होते. त्याबाबत तक्रार केल्यानंतर त्यांच्याकडील मीटर उलटा बसविला असल्याचे निदर्शनास आले, अशी एका नागरिकाने तक्रार केली.
—————————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!