डोंबिवली : दरवर्षी प्रमाणे यंदाच्या वर्षीही डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन आणि नवदुर्गा युवा मंडळाच्या माध्यमातून २६ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर या दरम्यान डी.एन.सी. शाळेच्या पटांगणावर रासरंग नवरात्र उत्सव रंगणार आहे. यंदाचे खास आकर्षण म्हणजे आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भेट देणार आहेत.
मराठमोळ्या भोंडल्याला गुजराती गरब्याची साज या रासरंग उत्सवामुळे मिळतो…दरवर्षी एक लाखांहून अधिक जण या उत्सवात हजेरी लावत असतात. तसेच या उत्सवाला मराठी, हिंदी सिने, नाट्य आणि टीव्ही विश्वातील अनेक प्रसिद्ध, कलाकार, गायक, गीतकार, संगीतकार हजेरी लावत असतात. नऊ दिवसात तुषार सोनिग्रा यांच्या बिट १६ चे वाद्यवृंद कार्यक्रमात संगीत संयोजन करतील. तर अर्चना महाजन, दिलेश दोषी, सेजल शहा, पंकज कक्कड, धर्मेश जोशी, कौशिक गाडा या कलावंताचे सादरीकरण होणार असून त्याला प्रसिद्ध निवेदिका शलाका हिच्या सुत्रसंचालनाची जोड मिळणार आहे.
कल्याण लोकसभेचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे विविध सांस्कृतिक कार्यक्रमातून देखील आपली संस्कृती टिकवून आहेत, कला नृत्य आणि संगीत याचा अनोखा संगम असलेला अंबरनाथ शिव मंदिर आर्ट फेस्टिवल तर साऱ्या देशात प्रसिद्ध आहे, तर नवरात्र उत्सवात डोंबिवलीत होणारा सर्वात भव्य दिव्य आणि उपनगरात मोठा अशी ख्याती असलेला रास रंग हा कार्यक्रम देखील डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन च्या माध्यमातून गेले काही वर्ष आयोजित केला जातो, तरुण-तरुणींसह अबालबुद्ध देखील या उत्सवाची प्रतीक्षा करत असतात.या उत्सवात विविध स्पर्धा होणार असून आकर्षक बक्षिसांची लयलूट सहभागी होणाऱ्यांना करता येणार आहे. महिलांसाठी भोंडला तसेच कुंकूमाकर्चन सुद्धा पार पडणार आहे.