डोंबिवली : येथील अभिनव बँकेत एका कंस्ट्रक्शन कंपनीचे जॉईंट अकाउंट आहे. मात्र एका भागीदाराने दुसऱ्या भागीदाराची चेकवर बनावट सही करून, 24 लाख रुपये काढण्याचा प्रयत्न केला. मात्र बँकेतील प्रशासनाच्या सतर्कतेमुळे हा डाव फसला आहे . यावेळी बँकेत हाणामारीच्या प्रकार घडला. कन्स्ट्रक्शन कंपनीच्या अन्य भागीदाराने गुरुनाथ म्हात्रे आणि त्यांचा मुलगा अनिकेत म्हात्रे यांच्या विरोधात विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. हा प्रकार 23 ऑगस्ट रोजी बँकेत घडला.
डोंबिवलीतील गुरुदीप कन्स्ट्रक्शन कंपनीचे अभिनव बँकेत खाते आहे. म्हात्रे कुटुंबीयाचे भाऊ आणि त्यांची मुले या कंपनीत भागीदार आहेत. 23 ऑगस्ट रोजी गुरुनाथ म्हात्रे आणि त्यांचा मुलगा अनिकेत म्हात्रे यांनी भागीदार अनमोल म्हात्रे यांची चेकवर बनावट सही करून धनादेश वटवण्यासाठी दिला होता. मात्र अनमोल म्हात्रे यांच्या सही विषयी बँक प्रशासनाला शंका आल्याने त्यांनी अनमोल म्हात्रे यांना बँकेत बोलावून घेतले. याचवेळी त्यांच्या समवेत अन्य भागीदार गोरखनाथ म्हात्रे हे सुद्धा उपस्थित होते. गुरुनाथ आणि गोरखनाथ हे दोघे भाऊ असून, बनावट वरून दोघांमध्ये बाचाबाची झाली. यावेळी गुरुनाथ म्हात्रे आणि त्यांचा मुलगा अनिकेत म्हात्रे यांनी गोरखनाथ म्हात्रे यांना जबर मारहाण केली. अशी तक्रार गोरखनाथ म्हात्रे यांनी विष्णुनगर पोलीस ठाण्यात केली आहे. हा सगळा प्रकार बँकेतच घडल्याने कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
कोट्यवधीची अफरातफर …
सिद्धी विनायक डेव्हलपर्स, अभिषेक डेव्हलपर्स, गुरुदीप कन्स्ट्रक्शन आणि साई डेव्हलपर्स या कंपनीच्या खात्यातून बँकेची दिशाभूल करून भागीदारांच्या खोट्या सह्या करून कोट्यावधी रुपयांची अपरातफर केल्या चा संशय निर्माण झाला असून या सर्व खात्यांची चौकशी करून याची माहिती मला देण्यात यावी तसेच पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी भागीदार अनमोल म्हात्रे यांनी बँक प्रशासनाकडे एका निवेदनाद्वारे केली आहे .