डोंबिवली :  स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणा-या कल्याण डेांबिवलीकरांना आजही अनेक समस्यांना झगडावे लागत असल्याचे चि़त्र दिसून येत आहे.  कचरा, रस्त्यावरील जीवघेणे खड्डे,  वाहतूक कोंडी या समस्या जनतेच्या पाचवीलाच पुजलेल्या असतानाच, आता पाण्याची वाढीव बिले आल्याने नागरिकांमध़्ये संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे कल्याण डोंबिवलीकरांचा वाली कोण ? असा प्रश्न यानिमित्त उपस्थित होत आहे. येत्या काही महिन्यांवर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक येऊ घातली आहे. या निवडणुकीत वाढीव पाणी बिलाचा प्रश्न पेटण्याची शक्यता आहे त्यामुळे वाढीव बिल रद्द न झाल्यास,  मतदार लोकप्रतिनिधींना धडा शिकविण्याच्या मनस्थितीत आहेत.

कल्याण-डोंबिवली शहराची दररोजची पिण्याच्या पाण्याची मागणी जवळपास ४५० एमएलडी आहे. पाणी पुरवठा करण्यासाठी बारावे, नेतिवली, मोहिली येथे पाणी शुद्धीकरण करण्याची कल्याण-डोंबिवली महापालिकेची स्वतंत्र यंत्रणा आहे. ग्रामीण भागाला एमआयडीसीकडून पाणी पुरवठा केला जातो. पाणी बिलात सरसकट २ टक्के वाढ करण्यात आल्याने नागरिकांना पाण्याची वाढीव बिल आली आहेत याकडे शिवसेनेचे माजी स्थायी समिती सभापती वामन म्हात्रे यांनी लक्ष वेधले आहे.


वाढीव पाणी बिल तत्काळ  रद्द करा : वामन म्हात्रे 

कौलारू चाळीत राहणारे १०० अथवा १५० चौरस फुटाच्या रूम, पत्र्याच्या २००, २५० चौरस फुटाच्या चाळी, सोसायटीतील ५०० ते १००० चौरस फुटाचे फ्लॅट आणि ३ हजार ते १०,००० चौरस फुटाचे बंगले या सर्वांना सरसकट दोन टक्के पाणी बिल वाढवलेली आहेत असे म्हात्रे यांनी सांगितले. सरसकट दोन टक्के वाढ ही अन्यायकारक आहे. त्यामुळे चाळीत, कौलांच्या, पत्र्याच्या रूम मध्ये राहणाऱ्या रहिवाश्यांची  वाढीव बिल तातडीने कमी करण्यात यावी अशी मागणी माजी नगरसेवक वामन म्हात्रे यांनी केलीय. पाणी बिल भरण्यापेक्षा पाणी चोरून वापरणाऱ्यांची संख्या जास्त आहे. वाढीव बिलं रद्द झाल्यास  गोरगरीब नागरिकांना दिलासा मिळेल असेही म्हात्रे यांचे म्हणणे आहे.

सरसकट दोन टक्के वाढीस कडाडून विरोध ..

ज्यावेळी पाणी बिलात सरसकट दोन टक्के वाढीचा प्रस्ताव आला होता त्यावेळी मी एकट्याने याला कडाडून विरोध केला होता. त्यावेळी लोकप्रिनिधींनीकडून कोणतीही साथ मिळाली नाही. तसेच या महत्वाच्या प्रश्नावर मीडियाने चुप्पी साधली असा आरोपही म्हात्रे यांनी केला. ही अन्यायकारक वाढ रद्द न झाल्यास  करदात्या मतदारांनी आपला राग   मतपेटीतून व्यक्त  करावा असे आवाहनही म्हात्रे यांनी केले आहे.


शिंदे – चव्हाण लक्ष देतील का ?

ठाणे जिल्ह्याचे तत्कालीन  पालकमंत्री एकनाथ शिंदे हे आता मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत तर डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण हे कॅबिनेट मंत्री झाले आहेत. त्यामुळे शिंदे – चव्हाण हे  वाढीव पाणी बिलाचा प्रश्न चुटकी सरशी सोडवू शकतात. त्यामुळे शिंदे चव्हाण  वाढीव पाणी बिलं रद्द करून कल्याण डोंबिवलीकरांना दिलासा देतील का ? असाही प्रश्न नागरिकांमध्ये व्यक्त हेात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!