बदलापूरमध्ये खड्डयाने घेतला तरूणाचा बळी : १५ दिवसात आठ जणांचा मृत्यू
बदलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी रस्त्यांवर पडलेल्या खड्यांचे सेल्फी ट्वीटरवर पोस्ट करून राज्य सरकारची रस्त्यांच्या बाबतीत उदासीनता चव्हाट्यावर आणली असतानाच दुसरीकडे बदलापूरात खड्डयाने एका तरूणाचा बळी घेतलाय. प्रवीण गायकवाड असे त्या तरूणाचे नाव आहे. अंबरनाथ बदलापुरात मागील १५ दिवसात अपघातात एकूण आठ जणांचा मृत्यू झालाय.
बदलापूर बेलवली शहरातून जाणाऱ्या कल्याण बदलापूर या महामार्गाचे सिमेंट काँक्रीटचा काम गेल्या एक वर्षापासून तयार आहे. मात्र या रस्त्याला समांतर दोन्ही बाजूने फुटपाथ तयार करण्यात आले नसल्याने रस्त्याच्या शेजारी एक फुटांपेक्षा अधिक खड्डे तयार झाले आहेत. त्या खड्डयांमुळे पादचारी नागरिकांना खूपच त्रास होतोय तर लहान मुले आणि वृध्दांचा तोल गेल्याने अपघाताच्या घटनाही झाल्या आहेत. मंगळवारी रात्री उशिरा प्रवीण गायकवाड हा तरूण रस्त्याने पायी जात असतानाच अंधारात रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्याच्या अंदाज न आल्याने तोल गेल्याने तो खाली पडला. त्यामुळे त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. प्रवीण हा घरचा एकमेव कमावता होता. शिवाय त्याची आर्थिक परिस्थिती ही हलाखीची होती.त्याच्या मृत्यूने त्याच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.या अपघात नंतर ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी स्थानिकांनी केलीय.
आता तरी सरकारला जाग येईल का ?
खासदार सुप्रिया सुळे यांनी बुधवारी कात्रज-उंड्री बायपास आणि बोपदेव घाटातील रस्त्यावरील खड्ड्यांसोबत सेल्फी काढले आणि ट्वीटरवर पोस्ट केले. या ट्वीटमध्ये त्यांनी राज्याचे महसूल मंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनाही टॅग केलय. काही दिवसांपूर्वीच चंद्रकांत पाटील यांनी खड्डेमुक्त महाराष्ट्रासाठी नवी डेडलाईन जाहीर केली आहे. येत्या 15 डिसेंबरपर्यंत राज्यात एकही खड्डा दिसणार नाही, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. बदलापूरमध्ये एका खड्डयाने जीव घेतल्यानंतर तरी राज्य सरकारला जाग येईल का ? असाच प्रश्न उपस्थित होताय.