ठाणे ; जिल्ह्यासाठी अतिशय महत्वाच्या अशा ९०० खाटांच्या जिल्हा रुग्णालयाच्या प्रस्तावित बहुमजली इमारती संदर्भात सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी रुग्णालयाच्या निविदापूर्व प्रक्रियेतील प्रशासकीय अडथळ्यांचा निपटारा करण्याचे आदेश प्रशासनाला दिले. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या प्रस्तावित ठाणे जिल्हा रुग्णालय, परिचारिका प्रशिक्षण केंद्र व वसतिगृह या बहू उद्देशीय बांधकामामागचं विघ्न दूर होणार आहे.

५२७.४१ कोटी रुपयांच्या खर्चाच्या या प्रकल्पाला अगोदरच मंजुरी मिळाल्यानंतरही रेंगाळलेल्या या प्रकल्पाला आता खऱ्या अर्थाने चालना मिळाली आहे. रुग्णालयाची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून ठाणे कल्याण डोंबिवली भिवंडी बदलापूर अंबरनाथ मुरबाड व अन्य शहरी आणि ठाणे ग्रामीण भागातील रुग्णांना या प्रस्तावित बहू मजली बहू उद्देशीय रुग्णालयाचा फायदा होणार आहे.

ठाणे जिल्हाधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग, ठाणे महानगरपालिका, भूमी अभिलेख कार्यालय, जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या कार्यकक्षेत मोडणारे विविध विषय गेली अनेक दिवस प्रलंबित आहेत. यामध्ये प्रामुख्याने जमिनीच्या मालमत्ता पत्रकावर सरंक्षण विभागाऐवजी महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभाग जिल्हा शल्य चिकित्सक ठाणे यांची नोंद होणे, रुग्णालय बांधकामास पालिकेने तात्काळ मंजुरी देणे, पर्यावरण खात्याची मंजुरी आणणे, अग्निशमन दलाची परवानगी आणणे, इमारतीस अडथळा होणारी झाडे तोडणे अशा विविध प्रशासकीय मान्यता मिळवण्यास चालना देण्यात आली.
ठाणे जिल्ह्यातील एकमेव मंत्री या नात्याने कामाला सुरुवात केली तेव्हा जिल्ह्यातील आरोग्य सुविधांसाठी गरजेच्या नियोजित ठाणे जिल्हा रुग्णालयाला प्रशासकीय अडथळ्यांची बाधा झाल्याचे चव्हाण यांना समजले. याबाबत माहिती मिळताच चव्हाण यांनी जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे महानगरपालिका व सा. बां. खात्याची जबाबदारी निश्चित करून याबाबत अधिक वेगाने कामे करण्याचे आदेश चव्हाण यांनी दिले.

सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या उच्चस्तरीय अधिकारी वर्गाच्या बैठकीत चव्हाण यांनी पुढील दीड वर्षात जिल्हा रुग्णालय ठाणे जिल्हावासियांच्या सेवेत येईल अशी अपेक्षा व्यक्त केली. या प्रसंगी ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, सा. बां. सचिव साळुंखे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार, भूमी अभिलेख उप अधीक्षक योगेश सावकार, ठामपाचे सतीश उईके, अशोक राजमाने, सा. बां. ठाणे विभाग कार्यकारी अभियंता सुनील पाटील असे जिल्ह्यातील सर्व उच्च पदस्थ अधिकारी हजर होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!