रविवार दिनांक १४ ऑगस्ट २०२२ मराठा समाजाचे नेते विनायकराव मेटे यांचे अपघाती निधन झाल्याची बातमी सकाळी सकाळी समजली. गडबडीने टीव्ही समोर येऊन बसलो. सर्व न्यूज चॅनेलवर मेटे साहेबांचे दुःखद निधन झाले, अशा बातम्या येत होत्या….मराठा समाजाचे नेतृत्व अनेक वर्षे त्यांनी केलं. तरुण वयामध्ये चळवळीच्या माध्यमातून राजकारणामध्ये त्यांनी प्रवेश केला. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे ही भूमिका घेऊन महाराष्ट्र भर मराठा समाजामध्ये जनजागृतीचे काम केले. राजकारणाच्या पटलावरती मराठा समाजाचे अनेक प्रश्न त्यांनी मांडले. ६ वर्षे विधानपरिषदेमध्ये त्यांच्या बरोबर काम करण्याची मला संधी मिळाली. सभागृहामध्ये ज्या ज्या वेळी मराठा समाजाचा प्रश्न आला त्यावेळी ते पोटतिडकीने बोलायला उभे राहत. सभागृहातील सर्व सदस्य मराठा समाजाच्या प्रश्नावर बोलण्याचा हक्क आहे समजून त्यांना सर्वांची मूक संमती असे. मराठा समाजावर बोलायला सभागृहामध्ये पुरेसा वेळ मिळाला पाहिजे असा आग्रह ते धरत असत.

ग्रामीण भागातला मराठा समाज हा अल्पभूधारक झालेला आहे, भूमिहीन झालेला आहे, तो दऱ्याखोऱ्यात खेडोपाडी राहतो. त्याची उदरनिर्वाहाची साधन तोकडी आहेत अनेक मराठा समाजातील शेतकरी, शेतमजूर हे कर्ज बाजारी झाल्यामुळं मोठ्या प्रमाणात आत्महत्या करत आहेत. त्यांच्या लेकरबाळांना शैक्षणिक व नोकरीमध्ये आरक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका घेऊन आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहिले. भारतीय जनता पक्षा बरोबर घटक पक्ष म्हणून केंद्रीय मंत्री रामदास आठवले साहेबांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट), महादेव जानकर साहेबांचा राष्ट्रीय समाज पक्ष व आमची रयत क्रांती संघटना आम्ही २०१४ पासून ते आजपर्यंत काम करत असताना घटक पक्ष हे एकत्रित ठेवण्याचे काम त्यांनी केलं.

अनेक मेळावे कार्यक्रम घटक पक्षाच्या नेत्यांना बरोबर घेऊन त्यांनी संपन्न केले. २०१४ साली भाजप शिवसेनेची युती संपुष्टात आल्या नंतर घटक पक्षांच्या समोर मोठ्ठा पेचप्रसंग निर्माण झाला. त्यावेळी शिवसेनेबरोबर राहायचे की भाजप बरोबर राहायचे हा विषय चर्चेला आला. मला आठवत मातोश्री वरून नार्वेकर साहेबांचा फोन घटक पक्षांना आला. सायंकाळची वेळ होती. सर्वसाधारणपणे ११ वाजून गेले होते. घटक पक्षाचे नेते माजी खासदार राजू शेट्टी साहेब व आमदार महादेव जानकर साहेब, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर,आमदार विनायक मेटे साहेब आम्ही मातोश्रीवर गेलो. त्यावेळी मातोश्रीवरती आदरणीय शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे साहेब, खासदार अनिल देसाई, आदरणीय रामदास कदमजी, आदरणीय दिवाकर रावते साहेब ही सगळी मंडळी होती. २८८ विधानसभेच्या जागेचा तक्ता समोर ठेवला. परंतु आम्ही सर्वांनी आग्रह धरला की तुमची युती ही टिकली पाहिजे, भले आम्हाला जेवढ्या जागा देता येतील तेवढ्या द्या किंवा आम्हाला एकही जागा नाही दिली तरी चालेल, पण तुम्ही एकत्रित राहा ही भूमिका मेटे साहेबांनी घेतली. उद्धव साहेबांचा आग्रह होता की तुम्ही आमच्या बरोबर राहा. आम्ही तुम्हाला निश्चितपणे मान सन्मान देऊ. परंतु त्यावेळी मेटे साहेबांनी थोडा विचार करायला एक दोन दिवसांचा वेळ द्या अशा पद्धतीचा आग्रह धरून आम्ही सर्वजण रात्री २ वाजता मातोश्रीच्या बाहेर आलो. व त्यानंतर मेटे साहेबांनी भूमिका घेतली शेतकऱ्यांचे प्रश्न व मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सुटायचा असेल तर राज्यात व केंद्रात एका विचाराचे व एका पक्षाचे सरकार असणे आवश्यक आहे. आपण सर्वजण भारतीय जनता पक्षा बरोबरच गेलो पाहिजे अशी भूमिका त्यांनी त्या ठिकाणी मांडली. व आम्ही सर्वजण भारतीय जनता पक्षा बरोबर युतीमध्ये आलो ते शेवटपर्यंत. २०१४ ते आजअखेर भारतीय जनता पक्षाबरोबर राहिलो.

भारतीय जनता पक्षाकडून सर्व घटक पक्षांना सन्मान दिला. दिलेल्या शब्दाप्रमाणे सर्वाना सत्तेमध्ये सहभागी करून घेतलं. सत्ता आल्यानंतर आपण जे प्रश्न घेऊन आत्तापर्यंत लढलो त्या प्रश्नाला न्याय मिळाला पाहिजे अशी भूमिका ठामपणे घेतली. कारण देवेंद्रजींचा सुद्धा आम्हाला फोन आला होता की तुम्ही आमच्याबरोबर या आम्ही घटक पक्षांना न्याय देऊ. आम्ही त्यांच्यासोबत गेलो आणि देवेंद्रजींनी दिलेला शब्द पूर्ण केला. रिपाईच्या रामदास आठवले साहेबांना खासदार केलं. केंद्रात मंत्री देखील केलं. रासपाच्या महादेव जानकर यांना आमदार आणि मंत्री केलं. मेटे साहेबांना दोन वेळा आमदारकी दिली व छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचं अध्यक्ष केलं, देवेंद्रजींनी दिलेल्या शब्दाला ते जागले. भविष्य काळामध्ये सुद्धा ते मेटे साहेबांना आमदार करणार होते, त्यांच्यावर जबाबदारी देणार होते आणि ते नेहमी म्हणत राहायचे देवेंद्रजी हे शब्दाला जागणारे नेते आहेत आणि त्याचा प्रत्यय तोही पाहायला मिळाला. दुःखद घटना घडल्या बरोबर देवेंद्रजी त्यांना पाहायला दवाखान्यामध्ये गेले. व त्यानंतर त्यांच्या अंत्यविधीसाठी उपस्थित राहिले त्यांच्या घरच्यांचे सुद्धा सांत्वन केले. विनायक मेटे गेल्याचं दुःख देवेंद्रजीच्या चेहऱ्यावर दिसून येत होतं. घटक पक्ष म्हणून आम्ही देवेंद्रजी सोबत एकजुटीने ताकदीना सोबत होतो. आज घटक पक्षातला एक तारा निखळला.

एक आठवणीतला हृद प्रसंग म्हणजे, २०१६ साली मी आमदार झाल्यानंतर माझ्या गावात गावकऱ्यांनी मोठी जंगी मिरवणूक घेतली होती. मेटे साहेब मुंबईवरून सायंकाळी ८ वाजता आले आणि मिरवणूकीला सुरवात झाली. माझ्या गावातील लहान पोरांपासून ज्येष्ठ मंडळी पर्यंत सर्वजण सहभागी झाले होते. झांझपथक व धनगरी ढोलांचा आवाज गावात घुमत होता. गावातल्या माय माऊल्या रस्त्याच्या कडेला पंचारती घेऊन उभा राहिल्या होत्या. सगळा गाव गुलालात नाहून निघाला होता. गावातली तरुण पोरं मेटे साहेबांना खांद्यावरती घेऊन वाद्यांच्या निनादामध्ये बेभानपणे नाचत होती. तब्बल ३ तासांपेक्षा अधिक वेळ मेटे साहेब तरुणांच्या खांद्यावर होते. मिरवणुकीच्या समारोपाचे भाषण करत असताना मेटे साहेबांच्या डोळ्यात अश्रू आले. “एखादं गाव आपल्या लेकरावरती भरभरून प्रेम करत” हे पाहिल्यानंतर सदाभाऊ सारखा शेतकरी नेता हा कुटुंबाचा नाही तर संपूर्ण गावाचा आहे, हे आज ह्या गावात ह्या ठिकाणी त्यांच्या गावातील जनतेच्या कृतीतून मला पाहायला मिळालं.” तुम्ही वाढवलेलं हे नेतृत्व हे मरळनाथपूर गावाचं राहिलं नाही. तर ते आत्ता महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेचं झालं आहे हे त्यांनी गावाला आवर्जून सांगितलं. दोन दिवसांनी मी मुंबईमध्ये गेल्यानंतर गावातील सर्व जनतेचं व तरुणांचं त्यांनी तोंड भरून कौतुक केलं व माझ्या गावातील ग्रामदैवत मरळनाथाच्या मंदिरासाठी आमदार फंडातून हॉल बांधायला निधीचं पत्र त्यांनी माझ्या हातामध्ये दिलं. ज्या मरळनाथाच्या आशिर्वादाने तुमच्यासारखं नेतृत्व ह्या महाराष्ट्राला मिळालं. त्या मरळनाथपूर पुण्य भूमीतील मरळनाथाला आपल्याकडून जे अर्पण करता येत आहे ते मी करत आहे .आपल्या सहकाऱ्यांना बरोबर घेऊन जाण्याची क्षमता असणारं असं लाखात एक असं नेतृत्व होतं आमचं मेटे साहेब.

साहेब तुम्ही इतक्या लवकर जाल हे आजही मनाला पटत नाही.ह्या दुःखातून शिवसंग्राम परिवाराला व त्यांच्या कुटुंबाला सावरण्याची शक्ती परमेश्वर देवो. अशी प्रार्थना मी करतो व मराठा समाजासाठी लढणाऱ्या माझ्या लढवय्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो…🙏

– सदाभाऊ खोत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!