मुबंई : केंद्र सरकारने हर घर तिरंगा हा कार्यक्रम आणलाय यावर एक व्यंगचित्र व्हायरल होतेय 75 वर्षे झाली घराचा पत्ता नाही. ज्यांच्याकडे घरच नाही ते तिरंगा लावणार कुठे? अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे यांनी केली.
‘मार्मिक’च्या ६२ व्या वर्धापनदिनी बोलताना उद्धव ठाकरेंनी राज्यात नव्याने स्थापन झालेल्या एकनाथ शिंदे सरकारवर टीकास्त्र सोडलं. “राज्यात काही ठिकाणी अतीवृष्टी झाली आहे. पण महाराष्ट्रातलं सरकार आहे कुठे? काहीही न करता स्वत:चे सत्कार करून घेतले जात आहेत. पण अतिवृष्टीमुळे शेतकरी हवालदील झाला आहे. तिकडे जायला मंत्री कुठे आहेत ? मंत्र्यांचं खातेवाटपच झालेलं नाही. सगळे मंत्री आज आझाद आहेत. आझादी का अमृत महोत्सव. पदं मिळाली आहेत, पण जबाबदारी नाहीये. करा मजा”, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
“प्रादेशिक पक्ष संपवून टाकायचे हे विचार लोकशाहीला घातक आहेत. देशाच्या स्वातंत्र्यांची मांडणी झालीय त्यामध्ये संघराज्याची मांडणी झाली आहे. घटकराज्य एकत्र येवून देशाचं स्वातंत्र्य निर्माण झालेलं आहे. तुम्हाला प्रादेशिक पक्ष संपवायचे आहेत. म्हणजे तुम्हाला संघराज्य पद्धत संपवायची आहे का? संघराज्य तुम्हाला नकोय का? नागरिकांचं हे मत आहे का? त्यावर निवडणुका झाल्या पाहिजे. तुम्ही आज गादीवर बसलात म्हणजे हम करे सो कायदा नाही. अमृत महोत्सवातच तुम्हाला लोकशाही मृतावस्थेत न्यायची असेल तर अमृत महोत्सव काय?”, असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.
“बावनकुळेंवर निशाणा
“नड्डांनी जे प्रदेशाध्यक्ष नेमले आहेत, त्यांच्या नावात किती कुळे आहेत हे मला माहिती नाही. पण त्यांची कितीही कुळं उतरली, तरी शिवसेना संपवणं शक्य नाही. मग ती बावन असतील किंवा एकशे बावन असतील. त्याने मला फरक पडत नाही”, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर खोचक टिप्पणी देखील केली.