महापालिका आयुक्तांनी तिरंगा खरेदी करुन नागरिकांनी उत्सवात सहभागी होण्याचे केले आवाहन

ठाणे : केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार भारतीय स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त दैदिप्यमान इतिहासाचे अभिमानपूर्वक संस्मरण करण्यासाठी ‘घरोघरी तिरंगा’ उत्सव साजरा करण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत नागरिकांना तिरंगा सहज उपलब्ध व्हावा यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून मुख्यालय, प्रभाग समिती कार्यालय येथे सुरू करण्यात आलेल्या तिरंगा विक्री केंद्रास उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. आज महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी स्वतः तिरंगा खरेदी करून नागरिकांनी उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन केले. यावेळी ठाणे महानगरपालिकेचे उप आयुक्त बाळासाहेब चव्हाण, मुख्य वित्त व लेखा अधिकारी दिलीप सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

दिनांक 13 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत ‘घरोघरी तिरंगा’ हा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. भारतीय ध्वजसंहितनुसार ज्या ज्या ठिकाणी राष्ट्रध्वज लावण्यात येईल अशा प्रत्येक ठिकाणी त्याची प्रतिष्ठा राखून आणि तो स्पष्टपणे दिसेल अशा रितीने लावावा. फाटलेला अथवा चुरगळलेला ध्वज लावू नये, ध्वज कोणत्याही इतर ध्वजासोबत किंवा एकाच वेळी एकाच काठीवर इतर ध्वजासोबत फडकवू नये. ध्वज मोकळ्या जागेत किंवा घरावर लावायचा असल्यास तो दिनांक 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत दिवस रात्र फडकविता येईल. तसेच या कालावधीत राष्ट्रध्वज काळजीपूर्वक जतन करावा. तरी नागरिकांनी ध्वज खरेदी करुन ‘घरोघरी तिरंगा’ हा उत्सव साजरा करावा असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी यावेळी केले.

ठाणे महापालिका मुख्यालय व महापालिकेच्या सर्व प्रभाग समिती कार्यालयात तिरंगा विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले आहेत. घरोघरी तिरंगा या उपक्रमातंर्गत आपण खरेदी केलेला राष्ट्रध्वज दिनांक 13 ते 15 ऑगस्ट 2022 या काळात फडकविल्यावर 7039680034 या व्हॉटसॲप क्रमांकावर किंवा tiranga@thanecity.gov.in या ईमेलवर छायाचित्र पाठवावे असे आवाहनही ठाणे महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!