मुंबई : गेल्या 40 दिवसांपासून रखडलेला राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आज (9 ऑगस्ट) पार पडला. शिंदे गटाचे (Eknath Shinde) नऊ तर भाजपकडून (BJP) नऊ जणांचा शपथविधी पार पडला. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी 18 नवनियुक्त मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. मंत्रीमंडळ विस्तारात एकाही महिला आमदाराला संधी देण्यात आली नसल्याने सरकारवर टीका होत आहे.
आज सकाळी ११ वाजता राजभवनातील दरबार हॉलमध्ये एकूण 18 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह एकूण 20 जणांचे हे मंत्रिमंडळ असणार आहे. या शपथविधी सोहळ्याला राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले उपस्थित होते.
स्त्रीशक्तीवर अन्याय आहे – सुप्रिया सुळे
शिंदेसरकारच्या मंत्रीमंडळात महिलांना योग्य ते प्रतिनिधीत्व मिळेल अशी अपेक्षा होती परंतु एकाही महिलेला संधी मिळाली नाही. हे अतिशय खेदजनक असून राज्याच्या स्त्री-शक्तीवर हा अन्याय आहे अशी थेट टिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी ट्वीट करत केली आहे.
शिंदेसरकारच्या १८ लोकांनी मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर खासदार सुप्रियाताई सुळे यांनी पंतप्रधानांच्या वक्तव्याची आठवण भाजपला करुन दिली आहे. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाच्या प्रगतीसाठी स्त्री-सक्षमीकरण आवश्यक असल्याचे सांगतात. त्यासाठी त्या केवळ ‘होम मेकर’ असू नयेत तर त्या ‘नेशन बिल्डर’ असाव्यात असं ते सांगतात मात्र आज राज्यात मंत्रीमंडळाच्या झालेल्या शपथविधीत १८ मंत्र्यांनी शपथ घेतली त्यात महिलांना प्रतिनिधीत्त्व देण्यात आले नाही याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
शिंदे गटातील मंत्री
तानाजी सावंत
उदय सामंत
संदीपान भुमरे
दादा भुसे
अब्दुल सत्तार
दीपक केसरकर
शंभूराज देसाई
संजय राठोड
गुलाबराव पाटील
भाजपकडून मंत्री
चंद्रकांत पाटील
सुधीर मुनगंटीवार
गिरीश महाजन
सुरेश खाडे
राधाकृष्ण विखे पाटील
अतुल सावे
रवींद्र चव्हाण
विजयकुमार गावित
मंगलप्रभात लोढा