ठाणे, दि. ५ – भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त ठाणे जिल्ह्यात दि. ९ ते १७ ऑगस्ट दरम्यान ‘स्वराज्य महोत्सव’अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. तसेच नागरिकांमध्ये देशाभिमान जागृत करण्यासाठी दि.१३ ते १५ ऑगस्ट दरम्यान ‘घरोघरी तिरंगा’ हे अभियान राबविण्यात येत आहे. ठाणे जिल्ह्यातील नागरिकांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी सोहळ्यात उत्स्फुर्तपणे व उत्साहाने सहभागी होऊन हे उपक्रम साजरे करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते यांनी आज येथे केले.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राबविण्यात येत असलेल्या ‘स्वराज्य महोत्सव’ व ‘घरोघरी तिरंगा’ अभियानाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी श्री. नार्वेकर व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सातपुते बोलत होते. यावेळी उपजिल्हाधिकारी गोपीनाथ ठोंबरे, जिल्हा प्रशासन अधिकारी श्री. देहरकर, तहसीलदार राजाराम तवटे आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी नार्वेकर म्हणाले की, ‘स्वराज्य महोत्सव’अंतर्गत २१ विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. यासंबंधीचे सूक्ष्म नियोजन जिल्हा प्रशासनाने केले आहे. त्याचप्रमाणे महानगरपालिका व जिल्हा परिषदेच्या स्तरावरही विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. जिल्ह्यातील नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपंचायत यांच्या विशेष सभांचे आयोजन करण्यात येणार आहे. जिल्ह्यात असलेली ऐतिहासिक स्थळे, पुरातत्वदृष्ट्या महत्त्वांच्या स्थळांची स्वच्छता, सुशोभिकरण करण्यात येत आहे. तसेच शासकीय इमारतींवर रोषणाई करण्यात येणार आहे.
महानगरपालिका, नगरपालिका यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील विविध महाविद्यालये, शाळांमध्ये स्वातंत्र्य चळवळीशी निगडीत चित्रकला, निबंध व वक्तृत्व स्पर्धा, सायकलोक्थॉन, मॅरेथॉन, प्रभात फेरी, चित्र प्रदर्शन, ऐतिहासिक वारसा स्थळांच्या ठिकाणी पदयात्रा, सांस्कृतिक कार्यक्रम आदी कार्यक्रमांची आखणी करण्यात आली आहेत. जिल्ह्याच्या ठिकाणी तिरंगा असलेले फुगे सोडण्यात येणार आहेत. स्वातंत्र्य चळवळीत सहभाग घेतलेल्या जिल्ह्यातील स्वातंत्र्यसैनिकांच्या माहितीचे प्रदर्शन भरविण्यात येणार असून एक पुस्तिकाही प्रसिद्ध करण्यात येणार आहे, अशी माहिती नार्वेकर यांनी दिली.
जिल्हा प्रशासन, महानगपालिका, पोलीस प्रशासनाच्या वतीनेही मॅरेथॉन, विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. ठाणे पोलीसांच्या वतीने उद्या मॅरेथॉन होणार आहे.तसेच जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीनेही मॅरेथॉन होणार आहे.
‘स्वयंस्फूर्तीने घरांवर तिरंगा लावावा’
स्वराज्य महोत्सवाप्रमाणेच जिल्ह्यात दि.१३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत नागरिकांची घरे, शासकीय, निमशासकीय, खासगी आस्थापना, सहकारी संस्था, शैक्षणिक संस्था यांच्या इमारतींवर राष्ट्रध्वजाची स्वयंस्फुर्तीने उभारणी करण्यासाठी ‘हर घर तिरंगा’ अर्थात ‘घरोघरी तिरंगा’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. नागरिकांनीही या उपक्रमात स्वयंस्फूर्तीने सहभाग घेऊन घरावर तिरंगा ध्वज लावावा. नागरिकांना ध्वज सहजतेने उपलब्ध व्हावेत, यासाठी महानगरपालिका, नगरपंचायत व ग्रामपंचायतींच्या माध्यमातून ध्वज विक्री केंद्रे सुरू करण्यात आली आहेत, असे श्री. नार्वेकर यांनी सांगितले.
ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भाग व नगरपालिका क्षेत्रात सुमारे ३ लाख ९२ हजार ४७८ इतकी घरे, संस्था आहेत. तसेच जिल्ह्याच्या सहा महानगरपालिका क्षेत्रात सुमारे १३ लाख घरे, शासकीय इमारती आहेत. अशा एकूण जिल्ह्यात सुमारे १७ लाख ध्वज लावण्याचे नियोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी आपल्या घरांवर, इमारतींवर ध्वज फडकावून या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. नार्वेकर यांनी केले.
विद्यार्थी बनणार तिरंगा स्वयंसेवक – डॉ. रुपाली सातपुते
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित घरोघरी तिरंगा उपक्रम मोठ्या प्रमाणात राबविण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने तयारी केली आहे. घरोघरी ध्वज संहिता पोचविण्यासाठी जिल्ह्यातील सुमारे साडेसात हजार विद्यार्थ्यांना तिरंगा स्वयंसेवक करण्यात आले आहे. तसेच या उपक्रमाच्या प्रचारासाठी जिल्ह्यातील ८० हजार विद्यार्थ्यांना तिरंगा दूत म्हणून नेमण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते यांनी दिली.
जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने स्वराज्य महोत्सव व घरोघरी तिरंगा हे दोन्ही उपक्रम राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. याअंतर्गत गावागावात प्रभात फेरी, शालेयस्तरावर निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, प्रश्न मंजुषा, पालक शिक्षक सभा यांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच महिलांसाठी मेळावे, महिला बचतल गटांसाठी मार्गदर्शन, मोबाईचे दुष्परिणाम विषयांवर शाळांमध्ये मार्गदर्शन, ग्रामपंचायतीच्या ठिकाणी अर्थसाक्षरतेसाठी बँकांचे मेळावे, शेतकरी मेळावे, स्वच्छता मोहिम आदी विविध उपक्रम ८ ते १७ ऑगस्ट दरम्यान जिल्हा परिषदेच्या वतीने राबविण्यात येत असल्याचे डॉ. सातपुते यांनी सांगितले.
०००००