मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची कारकीर्द अनेकदा वादात सापडलीय. मुंबईतील एका कार्यक्रमात राज्यपालांनी केलेल्या वक्तव्यानं नवा वाद निर्माण झालाय. मुंबई आणि ठाण्यातून गुजराती आणि राजस्थानी निघून गेले, तर मुंबई ही आर्थिक राजधानी राहणार नाही. राज्यपालांच्या या वक्तव्यानंतर राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस या तिन्ही पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली असून, काही नेत्यांकडून राज्यपाल हटाव अशी मागणी जोर धरू लागली आहे.
राज्यपालांचे हे पहिलेच वादग्रस्त वक्तव्य नसून, यापूर्वीही त्यांची वक्तव्य वादात सापडली आहेत. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळा अनावरण कार्यक्रमात पुण्यात राज्यपालांनी सावित्रीबाईंबाबत केलेले वक्तव्य वादग्रस्त ठरले होते. तसेच समर्थ आणि शिवरायांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल होतं. ठाकरे सरकारच्या काळात राज्यपालनियुक्त 12 आमदारांच्या नावांना त्यांनी अखेरपर्यंत मान्यता दिली नव्हती. त्यावरून महाविकास आघाडी विरूध्द राज्यपाल असा वादही रंगल्याचे दिसून आले. नव्या वक्तव्यामुळे ते पून्हा टीकेचे धनी बनले आहेत.
राज्यपालांचं विधान वैयक्तिक आहे : एकनाथ शिंदे
“राज्यपालांचं विधान वैयक्तिक आहे. त्यांच्याशी आम्ही सहमत नाही असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मुंबईच्या विकासात मराठी माणसाचं योगदान कुणीही नाकारू शकत नाही. १०६ हुतात्म्यांच्या बलिदानामुळे मुंबई महाराष्ट्राला मिळाली. यात हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचं योगदान सर्वांना माहिती आहे. मराठी माणसामुळे मुंबईला नावलौकिक प्राप्त झाला आहे.” असे शिंदे म्हणाले
राज्यपालांच्या विधानाशी आम्ही सहमत नाही ; देवेंद्र फडणवीस
राज्यपालांच्या विधानाशी आम्ही सहमत नाही. असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. “ महाराष्ट्राच्या इतिहासात आणि वाटचालीत मराठी माणसाचं कार्य, श्रेय हे सर्वाधिक आहे आणि उद्योगाच्या क्षेत्रात देखील, मराठी माणसाने जी प्रगती केली आहे. आज जगभरात मराठी माणसाचं नाव झालेलं आहे. हे खरंच आहे की विविध समाजांचं योगदान आपल्याला नाकारता येणार नाही. गुजराती, मारवाडी किंवा इतर कोणता समाज असेल, पण महाराष्ट्रच्या जडणघडणीत मराठी माणसापेक्षा मराठी उद्योजक, मराठी साहित्यक, विविध क्षेत्रातील मराठी लोक यांचा सहभाग हा सर्वात जास्त आहे.”असं फडणवीस म्हणाले.
महाराष्ट्रात वाद निर्माण करू नये : अजित पवार
मुंबई, ठाण्यासह अखंड महाराष्ट्र मराठी माणसांनी घडवला आहे. सर्वांना सोबत घेऊन जाण्याची महाराष्ट्राची संस्कृती, इतिहास आहे. महाराष्ट्र एकसंध, एकजूट आहे. महामहीम राज्यपाल महोदयांनी अनावश्यक वक्तव्ये टाळावीत. महाराष्ट्रात वाद निर्माण करू नये. महाराष्ट्राविना राष्ट्रगाडा न चाले हे लक्षात ठेवावे… खरा वीर वैरी पराधीनतेचा। महाराष्ट्र आधार या राष्ट्राचा।।” अशी प्रतिक्रिया विधानसभेचे विरो़धी पक्षनेते अजित पवार यांनी दिलीय.
मराठी माणसाचा अपमान केला : उद्धव ठाकरे
मुंबई कोश्यारींनी मराठी माणसाला आंदण दिलेली नाही. तर त्यावेळी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात अनेकांनी रक्त सांडून हक्काने मिळवलेली आहे. आज मराठी माणसाचा अपमान केलेला आहे, मराठी माणसाच्या मनात आग तर त्यांनी लावलेलीच आहे. “ज्या राज्यात तुम्ही जाता, ज्या राज्याची जबाबदारी तुम्हाला दिली जाते. त्या राज्यात सुखाने आणि आनंदाने नांदणाऱ्या नागरिकांमध्ये जाती-पाती, धर्मांवरून फूट पाडण्याचं आणि त्यांच्यात आग लावण्याचं काम जर कोश्यारी यांनी केलं असेल, तर त्यांना नुसतं घरी पाठायचं की तुरुंगात पाठवायचं हा विचार करण्याची देखील वेळ आलेली आहे.” असं माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे.
“मराठी माणसाला डिवचू नका : राज ठाकरे
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वादग्रस्त विधानानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यपालांवर निशाणा साधला . “मराठी माणसाला डिवचू नका” म्हणत राज ठाकरेंनी राज्यपालांना पत्र लिहलं आहे. ठाकरेंनी हे पत्र ट्वीट करत राज्यपालांना इशारा दिला आहे. महाराष्ट्रात मराठी माणसानं येथील जमीन आणि मन मशागत करुन ठेवल्यामुळेच इतर राज्यातील लोक इथे व्यवसाय करायला आले आणि येत आहेत ना? दुसरीकडे त्यांना असं वातावरण मिळेल का?’, असा सवालही राज ठाकरेंनी राज्यपालांना विचारला आहे.
राज्यपाल कोश्यारींनी माफी मागावी : नाना पटोले
“राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईबदद्ल अनावश्यक वक्तव्य करून मुंबई व महाराष्ट्राचा अपमान केला आहे. मुंबई उभारण्यात मराठी माणसाचेच योगदान सर्वात जास्त आहे, हे त्यांनी विसरू नये परंतु अभ्यास न करता कोश्यारी यांनी बोलून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्राचा अपमान केला आहे. त्याबद्दल त्यांनी माफी मागितली पाहिजे राज्यपाल हे मानाचे व प्रतिष्ठेचे पद आहे पण कोश्यारी यांनी या पदाची प्रतिमा धुळीस मिळवली आहे. त्यामुळे कोश्यारी यांची राष्ट्रपती, केंद्रीय गृहमंत्री व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यपालपदावरून उचलबांगडी करावी.” अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
राज्यपालांचे वक्तव्य योग्य : प्रकाश आंबेडकर
वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी कोश्यारी यांच्या वक्तव्याचे समर्थन केले आहे. राज्यपालांच्या विधानामुळे महाराष्ट्राचा अपमान झालेला नाही. त्यांनी केलेले वक्तव्य योग्य असून मी त्याचे समर्थन करतो. “राज्यपालांनी लगावलेला टोला हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील मराठी नेत्यांना आहे. या पक्षांनी एवढे वर्षे सत्ता उपभोगली. पण हे पक्ष अजूनही अर्थिक व्यवहार महाराष्ट्राच्या हातामध्ये देऊ शकलेले नाही. हा व्यवहार अजूनही गुजराती आणि राजस्थानी लोकांच्या हातात आहे. राज्यपालांच्या वक्तव्याने महाराष्ट्राचा बिलकूल अपमान झालेला नाही. त्यांनी सत्य परिस्थिती मांडली आहे,” अशी भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी मांडली.
राज्यपालांचं स्पष्टीकरण ; वक्तव्याचा विपर्यास केला
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केलेल्या भाषणासंदर्भात त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. नेहमीप्रमाणे माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. महाराष्ट्राच्या उभारणीत मराठी माणसाच्या कष्टाचे योगदान सर्वाधिक आहेच. अलीकडे प्रत्येक बाबतीत राजकीय चष्म्यातून बघण्याची दृष्टी विकसित झाली आहे, ती आपल्याला बदलावी लागेल, असं त्यांनी म्हटलं आहे. मराठी माणसाला कमी लेखण्याचा माझा कुठलाही हेतू नव्हता. केवळ गुजराती आणि राजस्थानी मंडळांनी व्यवसायात दिलेल्या योगदानावर मी बोललो. मराठी माणसांनीच कष्ट करून महाराष्ट्राला उभे केले. म्हणूनच आज अनेक मराठी उद्योजक नावाजलेले आहेत. ते केवळ महाराष्ट्रात नाही, तर भारतात आणि जगभरात मोठ्या दिमाखात मराठीचा झेंडा रोवून आहेत. त्यामुळे मराठी माणसाचे योगदान कमी लेखण्याचा कुठे प्रश्नच निर्माण होत नाही, असं राज्यपालांनी म्हटलं आहे.