मुंबई, दि. 18 : देशाच्या १६व्या राष्ट्रपतीसाठी आज निवडणूक पार पडली. देशात ९९ टक्के लोकप्रतिनिधींनी तर राज्यात 283 सदस्यांनी मतदानाचा हक्क बजावला असून 5 सदस्य आपला मतदानाचा हक्क बजावू शकले नाही. दिवसभर चाललेली ही मतदान प्रक्रिया शांतपणे पार पडली असल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी सांगितले.

देशाच्या १६व्या राष्ट्रपतीसाठी आज निवडणूक पार पडली. भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या द्रौपदी मुर्मू आणि विरोधकांचे संयुक्त उमेदवार माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांच्यात सरळ लढत होती. दरम्यान, आज झालेल्या निवडणुकीत ९९ टक्के लोकप्रतिनिधींनी आपला मतदानाचा हक्क बजावला, तर देशातील १० राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात १०० टक्के मतदान पार पडले. राष्ट्रपती पदासाठी ७७१ खासदार आणि ४०२५ आमदारांसह ४७९६ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. राष्ट्रपती पदासाठी देशभरातील राज्यांच्या विधानसभांमध्येही मतदान पार पडले.

महाराष्ट्रात विधानभवन येथे झालेल्या मतदान प्रक्रियेत २८७ पैकी २८३ आमदारांनी मतदान केले. आजारी असलेले भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप, शिवसेना आमदार महेंद्र दळवी, तुरुंगात असलेले राष्ट्रवादीचे आमदार अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांनी मतदान केले नाही. सेंट्रल हॉल, विधान भवन, मुंबई येथे राष्ट्रपती पदाकरीता मतदान प्रक्रिया पार पडली. मतदानानंतर सीलबंद मतपेटी आणि इतर निवडणूक साहित्य नवी दिल्ली येथे पाठविण्यात आले आहे. महाराष्ट्र विधान मंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र भागवत, उप सचिव तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी ऋतुराज कुडतरकर आणि अवर सचिव सुभाष नलावडे यांनी ही निवडणूक मतपेटी आणि इतर सीलबंद साहित्य छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई येथून विमानाद्वारे राज्यसभा सचिवालय, नवी दिल्ली येथे नेण्यासाठी प्रयाण केले.

या राज्यात १०० टक्के मतदान

राष्ट्रपती पदासाठी देशभरातील राज्यांच्या विधानसभांमध्येही मतदान पार पडले. छत्तीसगड, गोवा, गुजरात, हिमाचल प्रदेश, केरळ, कर्नाटक, मध्य प्रदेश, मणिपूर, मिझोराम, सिक्कीम आणि तामिळनाडू या 10 राज्यांमध्ये आणि पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशात १०० टक्के मतदान झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *