डोंबिवली : एका साधा रिक्षाचालक राज्याच्या मुख्यमंत्री पदी विराजमान झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांच्या समर्थनार्थ रविवारी डोंबिवलीतील हजारो रिक्षाचालकांनी वाजत गाजत रॅली काढण्यात आली.
एकता रिक्षा टॅक्सी चालक मालक सेना व जय मल्हार शालेय विद्यार्थी वाहक सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांच्या समर्थनार्थ आनंद उत्सव रिक्षा व स्कूल व्हॅन अशी मोठी रॅली काढण्यात आली.. सकाळी साडेनऊ वाजता देसले पाडा चौक येथून रॅलीस सुरुवात झाली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो असलेल्या बॅनर वर दुधाचा अभिषेक पूजा करण्यात आली. ढोल ताशाच्या गजरात आनंद उत्सव रॅली काढण्यात आली. यावेळी एकता रिक्षा चालक मालक सेनेचे व जय मल्हार शालेय विद्यार्थी वाहक संस्थेचे अध्यक्ष सुदाम जाधव, कार्याध्यक्ष अनिल म्हात्रे, शहर संघटक सुभाष पाटील, वैभव तुपे, संतोष कदम, राजे जैस्वाल लक्ष्मण फडतरे, उपाध्यक्ष संभाजी राठोड, विजय राठोड सरचिटणीस मनोज नाटेकर पप्पू शेख रवी यांच्या सहकार्याने रिक्षा चालकांची ही समर्थन रॅली संपन्न झाली.
एकनाथ शिंदे यांचा परिचय …..
साताऱ्यातील महाबळेश्वर तालुक्यातील दरे हे एकनाथ शिंदे यांचं गाव. ते शिक्षणासाठी ठाण्यात आले होते. गरीबीमुळे त्यांना शिक्षण अर्धवट सोडावं लागलं होतं. त्यानंतर त्यांनी एका मासळी विकणाऱ्या कंपनीत सुपरवाझर म्हणून काम केलं. पण त्यातून मिळकत होत नव्हती. म्हणून शिंदे यांनी रिक्षा चालवण्यास सुरुवात केली. याचवेळी ते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि ठाण्यातील शिवसेनेचे नेते आनंद दिघे यांच्या संपर्कात आले. तेव्हा त्यांचं वय होतं 18 वर्ष. वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षी त्यांनी शिवसेनेतून राजकीय श्रीगणेशा केला. शिवसेनेच्या प्रत्येक आंदोलनात सहभाग घेतला. महाराष्ट्र-कर्नाटक सीमा आंदोलनात त्यांनी पोलिसांचा लाठीमारही खाल्ला. मितभाषी, संयमी, पण आंदोलनात आक्रमक असलेल्या एकनाथ शिंदेंवर आनंद दिघेंची कृपा झाली आणि शिंदे ठाण्यातील किसन नगरचे शाखाप्रमुख झाले.
1997 ला नगरसेवक झाले…
1997मध्ये त्यांना आनंद दिघेंनी ठाणे महापालिका निवडणुकीचं तिकीट दिलं. या निवडणुकीत शिंदे घवघवीत मतांनी विजयी झाले. त्यानंतर ते ठाणे महापालिकेचे सभागृह नेतेही झाले. सभागृह नेते म्हणून पालिका गाजवल्यानंतर 2004मध्ये त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. पहिल्याच विधानसभा निवडणुकीत ते निवडून आले. 2004 पासून सलग चार वेळा ते कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून आमदारपदी निवडून आलेले आहेत. त्यानंतर 2014मध्ये शिवसेना विरोधी पक्षात बसणार होती. तेव्हा 12 दिवसांसाठी ते गटनेते झाले होते. त्यानंतर शिवसेना सत्तेत गेल्यानंतर ते मंत्रीही झाले. शिंदे यांनी या आधी २०१५ ते २०१९ पर्यंत सार्वजनिक बांधकाम या खात्याचे मंत्री म्हणून काम पाहिले. 2019मध्ये ते कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले. सध्या ते ठाकरे सरकारमध्ये नगरविकास मंत्री होते.