निवडणुकीत महिलांना ३३ टक्के आरक्षण द्या : महिला काँग्रेसने दिले तहसीलदारांमार्फत पंतप्रधानांना निवेदन
कल्याण : महिलांना लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये ३३% आरक्षण मिळायला पाहिजे या मागणी करिता कल्याण मध्ये महिला काँग्रेसच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तहसीलदारांमार्फत निवेदन देण्यात आले. हे निवेदन महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्षा अॅड. चारुलता टोकस यांच्या आदेशानुसार आणि आमदार संजय दत्त यांच्या मार्गदर्शनाने महिला जिल्हाध्यक्षा कांचन कुलकर्णी यांच्या नेतृत्त्वाखाली देण्यात आले.
विधानसभा व लोकसभा निवडणुकी मध्ये महिलांना ३३% आरक्षण द्यावे हे बिल संसदेत मांडून ते बहुमताने पारीत करावे यासाठी महिला काँग्रेसने स्वाक्षरी अभियान राबविले होते त्याचे निवेदन राष्ट्रपतींना दिले आहे. याची अमलबजावणी त्वरित व्हावी यासाठी आणखी एक निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदींना जिल्हाधिकारी यांच्या मार्फत देण्यात आले. भारतात लोकसंख्येमध्ये स्त्रियांची संख्या देखील मोठी असून आज विविध क्षेत्रात स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून बरोबरीने काम करत आहेत. मात्र राजकारणात महिलांना डावलण्यात येत आहे यावर मात करण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ३३ टक्के आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी पुढाकार घेतला होता. त्यांच्या या प्रयत्नांना यश मिळत महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये ३३ टक्के आरक्षण मिळाले सुद्धा. यानंतर कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी राज्य सरकारच्या मदतीने महिलांसाठीचे हेच आरक्षण ५० टक्यांवर नेले. याचा चांगला परिणाम पाहायला मिळत असून मोठ्या संख्येने महिला सक्रीय पणे राजकारणात येऊन निवडणुका लढवत आहेत. अशाच प्रकारे आरक्षण हे लोकसभा आणि राज्यसभा निवडणुकीत मिळावे यासाठी काँग्रेसने संपूर्ण भारतात स्वाक्षरी मोहीम सुरु केली होती याला देखील महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत काँग्रेसच्या या मागणीला पाठींबा दर्शविला होता. मात्र तरीही यादिशेने सरकारच्या वतीने कोणतीही पावले उचलली न गेल्याने कल्याणमध्ये महिला कॉंग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तहसीलदार आणि जिल्हाधिकार्यांमार्फत निवेदन देण्यात आले असल्याची माहिती कांचन कुलकर्णी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. या वेळी प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीस आणि कल्याण जिल्हा प्रभारी नीता त्रिवेदी,क्रांती चौधरी, सुरेखा लोहार, वंदना खोले, स्वाती पाटील, सीमा खान, गीता चौधरी,शबाना शेख, धनश्री टेम्बुलकर, शमीम शेख,शैलेश तिवारी, राहुल काटकर, नितीन झुंजारराव,अमोल पवार, नसीम खान, अनुपम त्रिपाठी आदी कल्याण काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.